… हे तर अमित शाह यांच्या राजकीय व्यवस्थापन कौशल्याचे यश: शिवसेना

मोदी हेच देशाचे भाग्यविधाते असून मोदींसमोर संपूर्ण विरोधक पाचोळ्यासारखे उडून गेले आहेत. मोदी यांच्या तुलनेत विरोधी पक्षात प्रभावी नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व नाही

संग्रहित छायाचित्र
नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी जनतेने मतदान केले असून हे यश मोदी यांच्या लोकप्रियतेचे आणि अमित शाह यांच्या राजकीय व्यवस्थापन कौशल्याचे आहे. नरेंद्र मोदी यांनी नवा इतिहास घडविला असून त्यांचे मनापासून अभिनंदन असे म्हणत शिवसेनेने मोदी- अमित शाह यांचे कौतुक केले आहे.

जनमताची नस पकडण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकवार यशस्वी ठरले असून २०१४चीच पुनरावृत्ती करीत २०१९च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने दमदार विजय मिळवला आहे. २०१४मध्ये भाजपने २८२ जागा जिंकल्या होत्या. यावेळी तब्बल ३०० जागांपर्यंत पक्षाने धडक दिली असल्याने एकहाती सत्ता स्थापित करण्याची क्षमता या पक्षाने कायम राखली आहे. शुक्रवारी सामनाच्या अग्रलेखातूनही या विजयासाठी मोदींचे कौतुक करण्यात आले आहे.

२०१४ मध्ये मोदी यांच्या नेतृत्वाने एकतर्फी विजय प्राप्त केला होता. २०१९ मध्ये विरोधकांनी मोठे वादळ उठवल्याचा भास निर्माण केला. प्रत्यक्षात तो हवेचा झोकाही निघाला नाही. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात मोदीप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने निर्विवाद मुसंडी मारली व लालकिल्ल्यावर पुन्हा एकदा भगवा फडकला. याचे विश्लेषण कसे करणार?, असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे. मोदी हेच देशाचे भाग्यविधाते असून मोदींसमोर संपूर्ण विरोधक पाचोळ्यासारखे उडून गेले आहेत. मोदी यांच्या तुलनेत विरोधी पक्षात प्रभावी नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व नाही, असेही अग्रलेखात म्हटले आहे.

राफेल विमान करारात मोदी सरकारने भ्रष्टाचार केला व अनिल अंबानी यांना फायदा व्हावा यासाठी सरकारने सत्तेचा दुरुपयोग केला… ‘चौकीदार चोर है’ अशा घोषणा राहुल गांधी जाहीर सभेतून देत राहिले, पण देशाच्या जनतेने चौकीदारावर प्रचंड विश्वास व्यक्त केला. मोदी यांनाच पुन्हा देशाचे चौकीदार म्हणून नेमले, उत्तर प्रदेशात मायावती व अखिलेश यादव यांचे महागठबंधन मोदी यांना आव्हान देईल व भाजपास पंधरा जागाही मिळणार नाहीत, असे ठामपणे बोलणारे तोंडावर आपटले. उत्तर प्रदेशबाबतीत सर्व ‘एक्झिट पोल’ खोटे ठरले व महागठबंधनवर भाजप भारी पडला. जात, धर्म यांच्या भिंती पाडून लोकांनी मतदान केले. मोदी यांची लोकप्रियता 2014च्या तुलनेत वाढत गेली व त्याचा अंदाज विरोधकांना आला नाही, असे अग्रलेखात म्हटले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shiv sena praises pm narendra modi amit shah for bjp victory in lok sabha election