एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत २०२२ मध्ये बंड केलं. एकनाथ शिंदे यांना भाजपाने पाठिंबा दिला. त्यांच्यासह ४० आमदार होते. भाजपाच्या पाठिंब्यावर ३० जून २०२२ ला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. तर उद्धव ठाकरेंचं सरकार अल्पमतात आल्याने २९ जूनला त्यांनी राजीनामा दिला आणि सरकार पडलं होतं. यानंतर शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंना दिलं. याच प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. कपिल सिब्बल यांनी ठाकरेंच्या शिवसेनेकडून युक्तिवाद केला. एकनाथ शिंदेंची हकालपट्टी करण्यात आली होती तर मग विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी त्यांना पक्षाचा नेता कसं ठरवलं असा सवाल कपिल सिब्बल यांनी केला आहे.

कपिल सिब्बल काय म्हणाले?

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदेंची नेतेपदावरून हकालपट्टी केली होती आणि त्या ठिकाणी अजय चौधरी यांची नियुक्ती केली होती. त्या पत्रावर उद्धव ठाकरे यांची सही होती. असं असतानाही विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना पक्षाचा नेता ठरवलं ते कसं काय? एकनाथ शिंदेंच्या गटाचा व्हिपही वैध ठरवला. हा निर्णय कशाचा आधारे ठरवला? असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. २०१८ च्या घटनेला उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याही आक्षेप नव्हता. मग निवडणूक आयोगाने ती घटना अवैध कशी ठरवली? असा प्रश्नही सिब्बल यांनी विचारला. शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीवर ठाकरेंच्या गटाकडून कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला.

शिवसेना एकनाथ शिंदेंकडे कशी जाईल याची व्यवस्था करण्यात आली-सिब्बल

शिवसेना फुटीनंतर तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी उद्धव ठाकरेंच्या विनंतीकडे दुर्लक्ष करून एकनाथ शिंदेंच्या आमदारांना पात्र ठरवलं. विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाने विधिमंडळातील फूट ही राजकीय फूट मानली आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात कशी जाईल याची व्यवस्था केली, असा मोठा आरोप कपिल सिब्बल यांनी केला.

राहुल नार्वेकरांविरोधात प्रश्नांच्या फैरीच

विधानसभा अध्यक्षांनी राजकीय पक्षसंघटना ही एकनाथ शिंदेंकडे आहे, ती उद्धव ठाकरे यांच्याकडे नाही हे ठरवलं. पण विधिमंडळाच्या बहुमताच्या आधारे त्यांनी हा चुकीचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे यांच्या वतीने एकनाथ शिंदे यांचा व्हिप चुकीचा आहे, तो ध्यानात घेऊ नका अशी विनंती करण्यात आली होती. असं असतानाही विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांचा व्हिप हा योग्य ठरवण्यात आला आणि तो कायद्याला धरून नाही, असाही युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.