उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असणाऱ्या शिवसेनेनं आता गोवा विधानसभेच्या निवडणुकीमध्येही उडी घेण्याचा निर्णय घेतलाय. पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी गोवा विधानसभेच्या ४० जागांपैकी २२ जागांवर शिवसेना उमेदवार देणार असल्याची घोषणा केलीय. बुधवारी राऊत यांनी ही घोषणा केली. तसेच गोव्यामध्ये शिवसेनेचं सरकार आलं तर शिवसेना महाराष्ट्रामधील प्रशासनाप्रमाणे गोव्यामध्येही चांगली कामगिरी करणारं सरकार देईल असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तसेच कोलकात्यामधील तृणमूल काँग्रेस गोव्यामध्ये निवडणूक लढू शकते तर महाराष्ट्रातील शिवसेना गोव्यातील निवडणुकीमध्ये उमेदवार देऊच शकते असं राऊत यांनी म्हटलं आहे.

“शिवसेना २२ जागांवर निवडणूक लढणार आहे. आम्ही या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीने उतरणार आहोत. आम्हाला कोणत्याही युतीची गरज नाही. आमची पक्षबांधणी उत्तम आहे. तर कोलकात्यामधील तृणमूल गोव्यात निवडणूक लढवू शकते तर महाराष्ट्र गोव्याच्या बाजूलाच आहे. आम्ही महाराष्ट्रामध्ये कशी कामगिरी केलीय हे तुम्ही पाहू शकता,” असं राऊत यांनी गोव्यातील डम्बोलिम विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं आहे. “महाराष्ट्रामध्ये शिवसेना ज्या पद्धतीने काम करत आहे आम्ही त्याच पद्धतीने गोव्यात काम करु. शिवसेना आणि गोव्याचं भावनिक नातं आहे,” असं राऊत म्हणाले.

गोव्यामधील कोणत्याही पक्षाने आमच्याकडे युतीसंदर्भात विचारणा केलेली नाही असं राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र त्याचवेळी गोवा फॉर्वड पक्षाचे विजय सरदेसाई आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोव्याचे माजी प्रमुख सुभाष वेलिंगकर यांची आपण गोवा दौऱ्यादरम्यान भेट घेणार असल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलंय.

“मी विजय सरदेसाई, वेलिंगकर यांची भेट गेणार आहे. नवे आणि जुने पक्ष कार्यकर्ते या दौऱ्यात मला भेटणार आहेत,” असं राऊत म्हणालेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena to contest 22 seats in 2022 goa assembly polls sanjay raut scsg
First published on: 30-09-2021 at 10:45 IST