Shiva Sharma and Shraddha Dubey Influencer News: लखनौमधील एका उच्चभ्रू इमारतीतील चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमधून पडून २८ वर्षीय कोट्यधीश व्यावसायिक शिवा शर्मा याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. ९ ऑक्टोबर रोजी घडलेल्या या घटनेने आता खळबळजनक वळण घेतले असून, घटनास्थळावरून पोलिसांनी लैंगिक उत्तेजक औषधे आणि इतर सामग्री जप्त केली आहे. तसेच, घटनेनंतर अवघ्या १५ मिनिटांत ‘सचिवालय’ लिहिलेली एक पांढऱ्या रंगाची आलिशान ऑडी कार घटनास्थळी आल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने या प्रकरणातील गूढ आणखी वाढले आहे.
या प्रकरणी शिवाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून त्याची प्रेयसी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर श्रद्धा दुबे, तिची बहीण, चालक आणि अन्य दोघांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवा शर्माची आई रंजना शर्मा यांनी श्रद्धा दुबेवर खंडणी, मारहाण आणि हत्येचा आरोप केला आहे. शिवाला फ्लॅटमध्ये डांबून ठेवून त्याचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला आणि त्यानंतर त्याला बालकनीतून फेकून देण्यात आल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. शिवाच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर मारहाणीचे तसेच सिगारेटचे चटके दिल्याचे व नखांचे ओरखडे आढळल्याचे आईने म्हटले आहे. त्याच्या डोळ्यांना, जबड्याला गंभीर दुखापत झाली होती, बरगड्या आणि पाय फ्रॅक्चर झाले होते, तसेच नाका-कानांतून रक्त येत होते, असा दावा कुटुंबियांनी केला आहे.
“मृत्यूसमयी त्याच्या शरीरावर केवळ अंतर्वस्त्र होते आणि चेहऱ्यावर लिपस्टिक व शरीरावर मेकअपचे डाग होते”, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. राजकीय नेते, वरिष्ठ सनदी अधिकारी आणि भारतीय क्रिकेटपटूंबरोबर संबंध असल्याचा धाक दाखवून श्रद्धा शिवाला धमकावत होती, तसेच खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून तुरुंगात पाठवण्याची धमकी देऊन त्याच्याकडून पैसे उकळत होती, असेही कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
दिल्ली आणि नेपाळमध्ये संशयितांचा शोध
घटनेनंतर श्रद्धा दुबे फरार झाली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. पोलिसांनी रविवारी तिच्या दोन ते तीन निकटवर्तीयांची कसून चौकशी केली. श्रद्धाचा शोध घेण्यासाठी दिल्लीतील विविध ठिकाणांवर छापे टाकण्यात येत असून, तपास यंत्रणांच्या पथकांनी नेपाळ सीमेवरही तपास सुरू केला आहे. अवध ग्रीन अपार्टमेंट आणि रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. घटनेनंतर पहिल्या मजल्यावरील जिन्यावरून काही व्यक्ती घाईघाईने बाहेर पडताना दिसल्या आहेत.
दरम्यान, घटना घडल्यानंतर सुमारे १५ मिनिटांनी अपार्टमेंट परिसरात आलेली ‘सचिवालय’ पाटी लावलेली पांढरी ऑडी कार इमारतीजवळ वळण घेऊन निघून गेल्याचे फुटेजमध्ये दिसले आहे. ही कार कोणाची होती आणि त्यामध्ये कोण बसले होते? याचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच शिवा आणि श्रद्धा यांच्यातील मोबाईल चॅट्समध्ये अनेक राजकीय व्यक्तींचा उल्लेख आढळल्याने त्या दिशेनेही चौकशी सुरू आहे.
कोण आहे श्रद्धा दुबे?
श्रद्धा दुबे ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असून तिचा २०२२ मध्ये घटस्फोट झाला आहे. तिचा माजी पती आणि मुलगा रायबरेली येथे राहतात. लखनौच्या हजरतगंज येथील बालू अड्डा परिसरात ती राहत होती. तिने कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्समध्ये पदव्युत्तर पदविका पूर्ण केली आहे. हैदराबाद येथून तिने मॉडेलिंग आणि फॅशन ब्लॉगिंगला सुरुवात केली. लखनौमधील फॅशन जगतात सक्रिय असलेल्या श्रद्धाने काही फॅशन शोजचे आयोजन केले होते आणि ‘झी म्युझिक’च्या एका अल्बममध्येही तिने काम केले होते. तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर सुमारे १.४१ लाख फॉलोअर्स आहेत.
