Shivalik Sharma rape case acquittance: आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स सारख्या संघात निवड झाली तर क्रिकेट जगतातील सर्व काही मिळवता येऊ शकतं, असा एक समज आहे. १८ वर्षांत आयपीएलमध्ये पदार्पण केलेल्या अनेक खेळाडूंचे आयुष्य बदललं. कुणी भारतीय संघात पोहोचलं, तर कुणी आपले वेगळे स्थान निर्माण केले. पण गुजरातच्या शिवालिक शर्माबाबत वेगळाच प्रकार घडला. २०२४ च्या आयपीएल हंगामासाठी मुंबई इंडियन्समध्ये संधी मिळूनही तो काळाच्या पडद्याआड लुप्त झाला. कारण क्रिकेट नव्हते तर त्याच्यावर दाखल झालेला एक गुन्हा. मे २०२५ च्या पहाटे घरी अचानक जोधपूरचे पोलीस धडकले आणि २७ वर्षीय शिवालिक शर्माला बलात्काराच्या गुन्ह्याखाली अटक झाली. जिच्याबरोबर लग्नाची स्वप्न पाहिली होती, तिनेच शिवालिकविरोधात तक्रार दाखल केली.
बलात्काराच्या गुन्ह्याखाली अटक झाल्यानंतर शिवालिकचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. अटक झाल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. राजस्थानच्या तुरुंगात त्याने तीन आठवडे कारावास पूर्ण केला. वर्षभरानंतर आता राजस्थान उच्च न्यायालयाने त्याच्याविरोधातील एफआयआर आणि त्यासंबंधीची कारवाई रद्द केली आहे. ज्याला क्रिकेटचे मैदान गाजवायचे होते, त्या शिवालिक शर्माला एक वर्ष या गुन्ह्यामुळे वाया घालवावे लागले.
द इंडियन एक्सप्रेसने शिवालिक शर्माबद्दलचे वृत्त दिले आहे. ज्यामध्ये शिवालिकने वर्षभरात त्याच्याबरोबर काय घडले? याची माहिती दिली. या धक्क्यातून सावरत आता मी पुन्हा एकदा आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहत असून माझ्यातील खिलाडू वृत्तीचीच ही एक परीक्षा होती, असे मी समजतो, अशी भावना शिवालिकने व्यक्त केली.
कारावासातील ते धक्कादायक दिवस
शिवालिकने तुरुंगातील धक्कादायक आठवणी सांगितल्या. तो म्हणाला, “तुरुंगातील ते २० दिवस एका कठीण परीक्षेसारखेच होते. आयुष्य किती खडतर आहे, याची जाणीव झाली. तुरुंगात साधा पंखा नव्हता. जेवणापूर्वी हात धुण्यासाठी साध्या स्वच्छतेच्या सुविधा नव्हत्या. तुरुंगातील सहकारी शौचालयाच्या बाजूला राहत होते.”
ज्या दिवशी तुरुंगात नेण्यात आले, त्यादिवशीची आठवण सांगताना शिवालिक म्हणाला की, मला तुरुंगात नेले तेव्हा खूप पाऊस पडत होता. माझ्या सेलच्या बाजूला असलेले शौचालय वाहत होते. त्याचा घाणेरडा वास येत होता. तिथले वातावरण अतिशय घाणेरडे होते. जेवण तर इतके वाईट होते की, काही घास खाल्ल्यानंतर मी ते खाऊही शकत नव्हतो. मी आजारी पडू लागलो. पण तिथे औषधेही उपलब्ध नव्हते.
गुन्हा दाखल का झाला?
गुन्हा दाखल होण्यामागची कहाणी सांगताना शिवालिक म्हणाला की, माझ्या कुटुंबाने ऑगस्ट २०२३ मध्ये माझे लग्न ठरवले होते. त्याने द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, २०२४ च्या आयपीएल हंगामासाठी डिसेंबर २०२३ च्या लिलावात त्याची मुंबई इंडियन्स संघासाठी निवड झाली आणि तिथून अडचणी सुरू झाल्या. लग्नाचा खर्च, लग्नानंतर विभक्त राहण्याचा विषय आणि इतर कौटुंबिक कारणावरून मुलीच्या घरच्यांशी वाद होऊ लागले.
आयपीएलमध्ये निवड झाल्यामुळे मी लगेचच खूप मोठा होईल, असे मुलीच्या कुटुंबीयांना वाटत होते. त्यातून त्यांच्या अनपेक्षित मागण्या वाढू लागल्या, अशी माहिती शिवालिकने दिली. अर्थात २०२४ च्या आयपीएल हंगामात शिवालिकला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यावर्षी कोलकाता नाइट राइडर्सने जेतेपद पटकावले.
विभक्त राहण्याचा दबाव
लग्नानंतर शिवालिकने पत्नीसह वेगळे राहावे, अशी मुलीच्या कुटुंबियांची मागणी होती. मात्र आपण एकुलते एक असल्यामुळे आई-वडिलांचा सांभाळ करण्याला आपली प्राथमिकता असल्याचे शिवालिकने स्पष्ट केले. वडोदरा येथे आमचे प्रशस्त असे घर आहे. मात्र लग्नानंतर कुठे राहायचे यावरून वाद सुरू झाले. ज्याची परिणिती हा गुन्हा दाखल करण्यापर्यंत पोहोचली, असेही शिवालिकने सांगितले.
परस्पर संमतीने संबंध – उच्च न्यायालयाने काय म्हटले?
राजस्थान उच्च न्यायालयाने शिवालिक शर्मावरील एफआयआर रद्द केला आहे. फिर्यादी पक्षाने एफआयआर रद्द करण्यास विरोध केला होता. उच्च न्यायालयाने नमूद केले की, साखरपुडा झाल्यानंतर शर्मा आणि तक्रारदार यांच्यात संपर्क वाढला होता. तसेच त्यांच्यात संमतीने संबंध होत होते. तसेच सुनावणी दरम्यान सादर केलेले व्हॉट्सॲप चॅट्स, फोटो आणि इतर आर्थिक व्यवहारांचीही दखल उच्च न्यायालयाने घेतली.
शिवालिक शर्माची बाजू मांडणाऱ्या वकिलाने म्हटले की, दोघेही शिक्षित, प्रौढ नागरिक असून त्यांच्यात संमतीने संबंध निर्माण झाले होते. तसेच जे पुरावे समोर आले आहेत. त्यावरून लग्नाचे खोटे आश्वासन देण्यात आले, असे कुठेही दिसत नाही.
