मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्हातील एक मन सुन्न करणारी आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरूणाने १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर घरात घुसून कुऱ्हाडीने तब्बल २० वार केले. एवढ्यावरच न थांबता त्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलीला केसांना धरून फरफटत छतावर नेले आणि तिथे तिला गळफास देऊन मारण्याचा प्रयत्न केला. या अमानुष हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून ती मृत्यूशी झुंज देत आहे. धर्मेंद्र परिहार असे या विकृत आरोपीचे नाव असुन ग्रामस्थांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
घरात एकटी पाहून हल्ला
‘एनडीटीव्ही’ या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी पीडित मुलगी घरात एकटीच असल्याचे पाहून आरोपी धर्मेंद्र परिहार याने घरात जबरदस्ती प्रवेश केला. त्याने अत्यंत क्रूरपणे मुलीच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले. मुलीने आरडाओरडा केला असता, त्याने तिला फरफटत घराच्या छतावर नेले. तिथे तिच्या गळ्यात दोरी बांधून तिला छतावरून खाली लटकवण्याचा प्रयत्न केला.
या धक्कादायक घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये आरोपी गंभीर जखमी आणि रक्ताळलेल्या मुलीला छतावरून लटकवताना दिसत आहे. मात्र, त्याच वेळी आरोपीच्या हातातून दोरी सटकली आणि मुलगी खाली जमिनीवर पडली. त्यानंतर आरोपीनेही छतावरून खाली उडी मारली.
गावकऱ्यांमुळे वाचले प्राण
मुलीचा किंचाळण्याचा आवाज ऐकून शेजारी राहणारे लोक लगेच तिच्या घराकडे धावले. त्यांनी पाहिले की मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली आहे, पण तिचा श्वास सुरू आहे. गावकऱ्यांनी वेळ न घालवता तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर गंभीर जखमा झाल्या असून तिच्यावर अनेक टाके पडले आहेत. सध्या तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.
आरोपीला बेदम चोप, परिसरात तीव्र संताप
घटना घडताच संतप्त गावकऱ्यांनी आरोपी धर्मेंद्र परिहारला जागेवरच पकडले आणि त्याला बेदम चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा प्रयत्न आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
पीडितेच्या कुटुंबीयांनी सांगितले की, आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून मुलीची छेड काढत होता आणि तिला त्रास देत होता. काही आठवड्यांपूर्वीही त्याने मुलीचा विनयभंग केला होता, मात्र तरीही त्याचे धाडस वाढले आणि त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.
या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप उसळला आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी आणि त्याच्या घरावर बुलडोझर चालवून ते पाडण्यात यावे, या मागणीसाठी नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी तब्बल ७ तास महामार्ग रोखून धरला होता. अखेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपीवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा रस्ता रोको मागे घेण्यात आला.
