नवी दिल्ली : केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मंगळवारी मान्सूनच्या प्रगतीचा आढावा घेतला. या वेळी त्यांनी शेतकऱ्यांना वेळेत कृषीविषयक सल्ला देणे आणि ‘एल-निनो’च्या प्रभावापासून खरीप पिकांचे रक्षण करणे यासाठी राज्यांसोबत उत्तम समन्वय ठेवून तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. सरकार मान्सूनच्या स्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून असून कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी अलर्ट मोडवर आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

भारतीय हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, यंदा दक्षिण-पश्चिम मान्सून ४ जूनच्या सुमारास केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. सामान्यतः मान्सून १ जून रोजी केरळमध्ये पोहोचतो. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, यंदा मान्सून सरासरीच्या ९० टक्के राहण्याची शक्यता असून, पाऊस सरासरीपेक्षा कमी झाल्यास शेतीसमोरील अडचणी वाढू शकतात. विशेषतः, अल-निनोचा प्रभाव अधिक तीव्र झाला, तर खरीप पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतातील एकूण वार्षिक पर्जन्यमानामध्ये दक्षिण-पश्चिम मान्सूनचा वाटा ७० ते ७५ टक्के इतका मोठा आहे. देशातील एकूण पेरणी क्षेत्रापैकी ५१ टक्के भाग अजूनही कोणत्याही सिंचनाविना पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. यामुळेच भात (धान) यांसारख्या प्रमुख खरीप पिकांच्या उत्पादनासाठी हा मान्सून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

संयुक्त राष्ट्रांकडून सतर्कतेचा इशारा

संयुक्त राष्ट्रे : एल निनोच्या प्रभावामुळे जागतिक स्तरावर तापमानात मोठी वाढ होऊन तीव्र उष्णतेची लाट, दुष्काळ आणि अतिवृष्टीसारख्या हवामान संकटांचा धोका निर्माण होणार आहे, असा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक हवामानशास्त्र संघटनेने (डब्लूएसओ) दिला आहे. जून ते ऑगस्ट या कालावधीत जगातील बहुतांश भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त तापमान राहण्याची शक्यता असून, ही परिस्थिती किमान नोव्हेंबरपर्यंत कायम राहू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एल निनोचा थेट फटका दक्षिण आशिया आणि ऑस्ट्रेलियातील मान्सूनवर होण्याची शक्यता असून, तिथे दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ शकते; तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेत मुसळधार पाऊस होऊ शकतो. हा बदल गरीब देशांना आणखी संकटात टाकू शकतो, असे ‘डब्ल्यूएमओ’च्या सरचिटणीस सेलेस्टे साउलो यांनी सांगितले.