काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत अपशब्द काढले होते. त्यांना कोलूला जुंपा, चाबकाचे फटके द्या. अंदमानच्या ज्या कोठडीत सावरकर होते तिथे २४ तास राहुल गांधींना ठेवा. त्याशिवाय त्यांना सावरकर कळणार नाहीत. हा हिंदुस्थान आहे इटली नाही हे राहुल गांधींनी विसरू नये असे म्हणत उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींवर निशाणा साधला. सत्तेत असलो तरीही शेतकऱ्यांच्या बाजूनेच राहणार, सत्तेसाठी लाचार नाही होणार हा शब्द महाराष्ट्राला देतो असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. हिंगोलीमध्ये उद्धव ठाकरेंची सभा पार पडली त्यावेळी त्यांनी राहुल गांधीवर शाब्दिक प्रहार केले.

हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंनी सभा घेतली त्यावेळी त्यांनी राहुल गांधींवर घणाघाती टीका केली. एवढंच नाही तर जर जवाहरलाल नेहरूंनी सावरकरांसारखा सश्रम कारावास भोगला असेल तर मी नेहरूंना वीर जवाहरलाल नेहरू म्हणायलाही तयार आहे असाही टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

आज सभेचा चांगला मुहूर्त आहे आज रामनवमी आहे तर उद्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. या दोन्ही दिवसांचा चांगला मुहूर्त साधू मी इथे आलो आहे. तुमचे आजचे हे विराट रूप म्हणजे भगवं वादळ आहे. आमच्या सभेला भाड्याने माणसं आणावी लागत नाहीत तर भगव्या विचारांवर प्रेम करणारी माणसं आपोआप येतात आणि त्यांचा जनसागर होतो असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

मराठवाडा आज दुष्काळाने होरपळतो आहे, पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर आहे. अशा समस्या असूनही तुम्ही तुमचे दुःख बाजूला ठेवून इथे आलात. त्यामुळे मी तुम्हाला आणि महाराष्ट्राला शब्द देतो की छत्रपती शिवप्रभूंच्या, आई तुळजाभवानीच्या, बाळासाहेबांच्या आणि जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने मी कायम शेतकऱ्यांसोबतच असेन, त्यांची बाजू कायम मांडेन. सत्तेत असलो तरीही तुमची साथ कधीच सोडणार नाही, सत्तेसाठी लाचार होणार नाही असेही वचन तुम्हाला देतो असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.