शिवसेना आमदारांनी बंड पुकारल्यामुळे राज्यात एकीकडे आरोप-प्रत्यारोप होत असताना सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहेत. शहाजीबापू पाटील यांनी कार्यकर्त्यासोबत संवाद साधताना म्हटलेलं एक वाक्य सध्या तुफान व्हायरल झालं आहे. शहाजीबापू पाटील यांच्या “काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल” वाक्याची सध्या चांगलीच चर्चा रंगली असून यावर चक्क गाणंही आलं आहे. बंडखोर आमदारांचं नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदेंनाही या वाक्याची भुरळ पडली आहे.

उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांना माघारी घेण्याचं आवाहन; म्हणाले “कुटुंबप्रमुख म्हणून मी…”

मंगळवारी सकाळी सर्व आमदार गुवाहाटीमधील हॉटेलच्या लॉबीत आले असता शहाजीबापू पाटील यांचं कौतुक कऱण्यास सुरुवात केली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी शहाजीबापूंना ते सुपरहिट वाक्य पुन्हा एकदा म्हणून दाखवण्याची विनंती केली. यावर शहाजीबापूंनी ते वाक्य म्हणून दाखवताच उपस्थित आमदारांमध्ये एकच हशा पिकला.

VIRAL : ट्विटरवर ट्रेंड करतंय ‘काय झाडी, काय डोंगर, काय हाटील…एकदम ओके..!’; Memes चा पाऊस!

एकनाथ शिंदे यांनी यावेळी शहाजीबापूंना हे वाक्य किती व्हायरल झालं आहे हे सांगताना त्याची लोकांनी गाणी तयार केली असल्याचंही सांगितलं.

या व्हायरल डायलॉगचं कनेक्शन काय?

राज्यात सत्तासंघर्ष सुरु असून बंडखोर आमदार गुवाहाटीत आहेत. यादरम्यान एक ऑडिओ क्लिप सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांची ही ऑडिओ क्लिप असून यातील त्यांचे संवाद सध्या सोशल मीडियावर बरेच चर्चेत आलेत. त्यांच्या ऑडिओ क्लिपमधले हे संवाद सध्या सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आलेत.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोर आमदार हे गुवाहाटीत गेल्या काही दिवसांपासून थांबले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील हे ग्रामीण भागातील मतदार संघाचे नेतृत्व करत आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या मतदारसंघातील एका कार्यकर्त्याने शहाजी बापू पाटील यांना फोन केला होता. त्यावेळी कार्यकर्त्यासोबत झालेला त्यांचा हा संवाद मजेदार आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये ते त्यांच्या नेहमीच्या गावरान स्टाईलमध्ये बोलताना दिसून आले. “काय झाडी… काय डोंगार… काय हाटील… एकदम ओके!’ या शब्दाने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. हा शब्द धरून नेटकऱ्यांनी देखील काही मजेदार मीम्स शेअर करण्यास सुरूवात केली आहे.