राज्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होण्याची भीती निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे चार खासदार दिल्लीत पोहोचले असून, तिथे मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे चारही खासदार आज लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांची भेट घेण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हे खासदार आपल्यासोबत एकूण सहा खासदारांच्या पाठिंब्याचं पत्र देऊन एक वेगळा गट स्थापन करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दिल्लीत एकीकडे अशा गुप्त घडामोडी घडत असताना, दुसरीकडे ठाकरेंचे निष्ठावान नेते खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे हेदेखील दिल्लीत तळ ठोकून आहेत. त्यांनी दिल्लीत तातडीची पत्रकार परिषद घेऊन या संभाव्य बंडखोरीवर पक्षाची भूमिका मांडली आणि विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
‘ऑपरेशन टायगर’ सोपं नाही!
पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले, “आज माझ्यासोबत शिवसेनेचे गटनेते अरविंद सावंत, शिवसेनेचे मुख्य प्रतोद अनिल देसाई आणि नाशिकचे खासदार राजाभाऊ गोसे आहेत. कालपासून सर्वत्र अशा बातम्या किंवा अफवा पसरवल्या जात आहेत की दिल्लीत ‘ऑपरेशन टायगर’ सुरू आहे. पण शिवसेनेला (ठाकरे गट) तोडणं एवढं सोपं नाही. मुळात ही अफवा पसरवणाऱ्यांनीही हे मान्य केलंय की आम्ही अजूनही ‘टायगर’ आहोत. आमच्यापर्यंत अशा कोणत्याही घडामोडींची अधिकृत माहिती आलेली नाही. तुमच्या माध्यमातूनच (प्रसारमाध्यमांद्वारे) आम्ही हे सर्व पाहत आणि ऐकत आहोत.”
खासदारांना ५० कोटींची ऑफर?
यावेळी राऊतांनी खासदारांच्या खरेदी-विक्रीचा अत्यंत खळबळजनक आरोप केला. ते म्हणाले, “काल रात्री साधारण १०.३० ते ११ च्या सुमारास मला एका अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तीकडून सांगण्यात आलं की, महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेतलं जात आहे. ‘विकत घेतलं जातंय’ हाच शब्द त्यांनी वापरला. पक्षाचं नाव त्यांनी घेतलं नाही आणि मीही आता घेणार नाही. मी जेव्हा त्यांना विचारलं की काय भाव सुरू आहे? तेव्हा ते म्हणाले की भाव तोच आहे—५० कोटी! आज रात्रीपर्यंत सर्वांना १५ कोटी रुपये पोहोचवले जात आहेत, त्यानंतरच ते खासदार दिल्लीत येतील. त्याशिवाय ते विमानात बसायलाही तयार नाहीत. ही माहिती मी सोशल मीडियाद्वारे जनतेपर्यंत पोहोचवली आहे. अशा पद्धतीने जर शिवसेना किंवा टीएमसीसारखे इतर पक्ष तोडले जाणार असतील, तर या देशात निवडणुका लढण्याला काही अर्थच उरत नाही.”
मशाल चिन्हावर निवडून येऊन बेईमानी नको
“ज्या खासदारांची नावं सध्या माध्यमांमध्ये येत आहेत, ते नेमके कुठे आहेत हे मला माहीत नाही. कोणी म्हणतंय ते दिल्लीत आहेत, कोणी म्हणतंय मुंबईत तर कोणी मतदारसंघात आहेत,” असे सांगत राऊत पुढे म्हणाले, “हे सर्व खासदार शिवसेनेच्या ‘मशाल’ चिन्हावर आणि उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर निवडून आलेले आहेत. याआधी जेव्हा पक्षात फूट पडली, तेव्हा तो लोकांचा उद्रेक होता असं सांगितलं गेलं; कारण तुम्ही मोदींच्या नावावर मतं मागून निवडून आला होता. त्यासंदर्भातील कायदेशीर लढाई अजूनही सुप्रीम कोर्टात सुरूच आहे. मात्र, आता जे खासदार पूर्णपणे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून, आमच्या चिन्हावर आणि उद्धव ठाकरेंच्या मेहनतीवर निवडून आले आहेत, त्यांना अशा प्रकारे बेईमानी करण्याचा कोणताही अधिकार नाही.”
शिवसैनिकांच्या रोषाचा इशारा देताना ते म्हणाले, “आम्ही याक्षणी कोणावरही थेट आरोप करत नाही आहोत. पण मागे जे काही घडलं, त्याची पुनरावृत्ती जर आता होणार असेल, तर यावेळेला महाराष्ट्रातील जनता आणि शिवसैनिक गप्प बसणार नाहीत. जो काही राडा व्हायचा आहे तो होईल! ही जी डरपोकगिरी आणि नादानपणा सुरू आहे, तो अजिबात खपवून घेतला जाणार नाही.”
…तरीही त्यांनी साईबाबांची शपथ घेतली!
पक्षाच्या अंतर्गत बैठकीतील एक खळबळजनक प्रसंग सांगताना संजय राऊत भावूक झाले. ते म्हणाले, “मला आश्चर्य वाटतंय, काही दिवसांपूर्वीच आमच्या ‘मातोश्री’वरील बैठकीत स्वतः मी, अरविंद सावंत, संजय दिना पाटील, राजाभाऊ गोसे आणि अनिल देसाई प्रत्यक्षात हजर होते. काही खासदार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोडले गेले होते. त्या बैठकीतल्या एका खासदाराने तर अवघ्या तीन मिनिटांत तब्बल चारवेळा साईबाबांची शपथ घेतली! ‘माझी बायको आजारी आहे, साईबाबांची शपथ… मी तुमच्यासोबतच आहे, साईबाबांची शपथ… मरेपर्यंत तुमच्यासोबत राहीन, साईबाबांची शपथ…’ असं तो म्हणत होता. दुसऱ्या एकाने आई भवानीची शपथ घेतली, कोणी आपल्या मुला-मुलीची, तर कोणी थेट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेतली. त्यामुळे आम्हाला त्यांच्यावर विश्वास ठेवणं भाग होतं.”
शेवटी बंडखोरांना आव्हान देत राऊत म्हणाले, “आता ज्यांना कोणाला जायचं असेल त्यांनी खुशाल जावं, पण आधी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा. तुम्ही आमच्या पक्षाच्या तिकिटावर आणि आमच्या मतदारांच्या जिवावर निवडून आला आहात, हे विसरू नका. यातले काही जण तर आधी तीन-तीन वेळा पराभूत झाले होते, त्यांना पक्षाने खासदार बनवलं; काही जण घरी बसले होते, त्यांनाही पक्षाने संधी दिली.”
