पंजाब विधानसभेच्या आगामी निवडणुकांत आपल्यासोबत युती करण्याच्या माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या सूचनेचे भाजपाने बुधवारी स्वागत केले. सिंग हे देशभक्त असल्याचे सांगून, देशहिताला प्राधान्य देणाऱ्यांशी हातमिळवणी करण्यास आम्ही नेहमीच तयार असल्याचे भाजपाने सांगितले. अमरिंदर सिंग यांनी नवीन पक्षाची घोषणा करत भाजपासोबत जाण्यासंदर्भातील संकेत दिल्यानंतर शिवसेनेने आता पंजाबमधील या राजकीय भांगड्यावर भाष्य करत अमरिंदर सिंग यांच्यावर निशाणा साधलाय. त्याचप्रमाणे पंजाबमधील या सर्व राजकीय गोंधळामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा सहभाग असून राजकीय पोळी भाजण्यासाठी त्यांनी पंजाबमधील विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर हे सारं घडवून आणल्याची टीका शिवसेनेनं केलीय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भांगड्यामागचे ढोलवादक भाजपा…
“पंजाबचे ‘पायउतार’ मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर यांनी आता नव्या पक्षाची घोषणा केली आहे. कॅ. अमरिंदर हे कालपर्यंत काँग्रेस पक्षाचे पंजाबातील महत्त्वाचे शिलेदार होते. अनेक वर्षे ते काँग्रेसच्या माध्यमातून सत्तेचा लाभ घेत आहेत. भोगी व ऐयाशी अशी त्यांची प्रतिमा असतानाही काँग्रेसने त्यांना अनेक वर्षे सांभाळले. काँग्रेस पक्षातच त्यांच्या विरोधात नाराजी झाली, आमदारांत बंड झाले. विधिमंडळ काँग्रेस पक्षात एकही आमदार त्यांच्या बाजूने उभा राहिला नाही. कॅ. अमरिंदर पदावरून जातील तेवढे बरे, असेच प्रत्येकाला वाटत होते व अखेर ‘पतियाळा महाराज’ म्हणजे कॅ. अमरिंदर यांचा राजीनामा राहुल गांधींनी घेतला. यात त्यांचा असा काय अपमान झाला? पण आपला अपमान झाला असे म्हणत त्यांनी जो भांगडा सुरू केला, त्या भांगड्यामागचे ढोलवादक अर्थात भारतीय जनता पक्षाचे कलाकार होते हे आता स्पष्ट झाले,” अशी टीका ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आलीय.

आता त्यांना शेतकऱ्यांचा कळवळा आला
“कॅ. अमरिंदर यांनी नव्या पक्षाची घोषणा केली व शेतकऱ्यांचे वगैरे प्रश्न सोडवले तर आपला पक्ष भाजपाबरोबर युती करील, असे त्यांनी सांगितले आहे. हा गमतीचाच भाग आहे. पंजाबचे मुख्यमंत्री होते तेव्हा हे महाशय शेतकऱ्यांच्या प्रश्नी ठाम भूमिका घेऊन उभे राहिलेले कधी दिसले नाहीत. हे महाशय आपल्या फार्म हाऊसमध्येच स्वतःला कोंडून घेत. तेथे आमदार, मंत्री, अधिकाऱ्यांना येण्यासाठी मज्जाव होता. त्यामुळे शेतकरी त्यांच्यापर्यंत पोहोचणे शक्यच नव्हते. आता त्यांना शेतकऱ्यांचा कळवळा आला आहे व त्यासाठी ते भाजपाशी हातमिळवणी करायला तयार झाले,” असा टोला या लेखातून लगावण्यात आलाय.

अमरिंदर शेतकऱ्यांचे कोणते प्रश्न सोडवू इच्छित आहेत?
“मुळात शेतकऱ्यांना चिरडून मारणारे, शेतकरी खतम करणारे भाजपाचे शासनकर्तेच आहेत. एक वर्षापासून शेतकरी तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करीत आहेत. त्यांचे रक्त शोषण्याचेच काम या काळात झाले. हरयाणात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर निर्घृण हल्ले झाले व खट्टर यांच्या प्रेरणेने शेतकऱ्यांची डोकी फोडली गेली. तेव्हा कॅ. अमरिंदर यांना शेतकऱ्यांविषयी उमाळा आला असे दिसले नाही व त्याच भाजपाशी हातमिळवणी करून कॅ. अमरिंदर पंजाबात निवडणुका लढवायला निघाले आहेत. लखीमपूर खिरीमधील शेतकरी हत्याकांडाचा त्यांनी साधा निषेधही केला नाही. लखीमपूर खिरी घटनेची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली जात आहे. जालियनवाला बागेत ब्रिटिशांनी शीख शेतकऱ्यांचे हत्याकांड केले तसेच हत्याकांड लखीमपूर खिरीतही झाले. असे हत्याकांड करणाऱ्यांशी हातमिळवणी करून कॅ. अमरिंदर शेतकऱ्यांचे कोणते प्रश्न सोडवू इच्छित आहेत?,” असा प्रश्न लेखामधून विचारण्यात आलाय.

पंजाबचे राजकारण अस्थिर करून गोंधळ निर्माण करणे कोणालाच परवडणारे नाही
“कॅ. अमरिंदर हे पंजाबात काँग्रेसचे गलबत बुडवू इच्छित आहेत व त्यासाठी ते भाजपाला मदत करीत आहेत. पंजाबात भाजपाचे अस्तित्व नाही. अकाली दल गटांगळय़ा खात आहे. ‘आप’विषयी लोकांत आकर्षण आहे, पण केजरीवाल वगैरे लोकांवर विश्वास राहिलेला नाही. पंजाबात आजही काँग्रेसचा पाया भक्कम आहे तो कॅ. अमरिंदर किंवा इतर कोणामुळे नाही. अमरिंदर यांच्या जागी चन्नी हे दलित समाजातील नेते मुख्यमंत्री झाले. त्यांनी मंत्रिमंडळ बनवले व नवज्योतसिंग सिद्धूही आता शांत झाले आहेत. पंजाबचे राजकारण अस्थिर करून गोंधळ निर्माण करणे कोणालाच परवडणारे नाही. श्री. शरद पवारांसारख्या नेत्यानेसुद्धा याबाबत धोक्याचा इशारा दिला आहे,” असं लेखात म्हटलं आहे.

थेट नाव घेऊन टीका…
पंजाबची लढाई मोठी आहे असं म्हणत लेखाच्या शेवटी थेट पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका करण्यात आलीय. “पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा हे कॅ. अमरिंदर यांना ‘चावी’ मारून भाजपामध्ये प्राण फुंकण्याचा प्रयत्न करीत असतील तर हे राजकारण त्यांच्यावर उलटेलच, पण सीमेवरचे आणखी एक राज्य ते अकारण तणावग्रस्त करतील. पंजाबचा असा गोंधळात गोंधळ करणे देशासाठी धोकादायक ठरेल. कॅ. अमरिंदर यांना भाजपाने स्वपक्षात घेणे फायद्याचे ठरले नसते. कॅ. अमरिंदर यांना स्वतंत्र पक्ष स्थापन करायला लावून काँग्रेसच्या मतांचे विभाजन करायचे व आपली पोळी भाजायची हा भाजपाचा डाव आहे. त्यांना कॅ. अमरिंदरविषयी ममत्व असण्याचे कारण नाही. पंजाब निवडणूक संपल्यावर कोण अमरिंदर आणि काय ते शेतकऱ्यांचे प्रश्न? कॅ. अमरिंदर यांच्या पत्नी व मुलगाही काँगेस सोडायला तयार नाहीत असे वातावरण आहे,” असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena slams amrinder singh and bjp over punjab politics scsg
First published on: 21-10-2021 at 07:36 IST