“ज्ञानवापी मशीद, ताजमहाल, जामा मशीद, लाल किल्ल्याखालचे शिवलिंग शोधण्यापेक्षा शिवलिंगाचा निर्माता महादेव शंकराचे चीनच्या ताब्यात असणारे कैलास- मानसरोवर आधी ताब्यात घेतले पाहिजे,” असं म्हणत शिवसेनेनं सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवरुन ‘भाजपापुरस्कृत हिंदुत्ववाद्यां’ना सुनावलं आहे. एकीकडे मोहन भागवत यांचं ‘प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधू नका’ या भूमिकेसाठी स्वागत करताना दुसरीकडे काश्मीरमधील हिंसाचार, इतर देशांसोबतचे संबंध यासारख्या विषयांवरुन ‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेनेनं भाजपा नेते आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलंय.

शिवलिंगाचा सर्वत्र शोध घेणारे सरसंघचालकांचे मत मान्य करतील काय?
“सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशाच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका व्यक्त केली आहे, ‘‘प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधू नका, ‘आमचेच खरे’ असा कट्टरवाद नको.’’ भागवत यांची भूमिका हिंदुत्ववादी असली तरी संयमाची आहे. भागवत म्हणतात, ज्ञानवापीशी हिंदूंच्या भावना जुळलेल्या आहेत. त्यावर न्यायपालिका देईल तो निर्णय प्रत्येकाने मान्य करायला हवा. एकापरीने सरसंघचालकांनी देशातील सध्याच्या वातावरणावर परखड मत व्यक्त केले आहे, पण शिवलिंगाचा सर्वत्र शोध घेणारे सरसंघचालकांचे मत मान्य करतील काय?,” असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केलाय.

Difference Between Congress And BJP Manifestos Sankalp patra Nyay Patra
काँग्रेसच्या ‘महालक्ष्मी योजने’ला भाजपाकडून ‘लखपती दीदी’चं प्रत्युत्तर; काय आहेत जाहीरनाम्यात महिलांसाठीच्या योजना
eknath shinde devendra fadnavis
महायुतीत वादाची ठिणगी? भाजपा आमदार शिंदे गटातील खासदारावर टीका करत म्हणाले, “भ्रष्टाचाऱ्यांना…”
controversy over bjp candidate from north mumbai piyush goyal statement on rehabilitation of slum on salt pan lands
झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनावरून वादंग; गरीब हटाव हेच भाजपचे धोरण -विरोधकांची टीका, त्याच ठिकाणी घर देण्यासाठी कटिबद्ध -गोयल यांचे प्रत्युत्तर
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी

ती संयमी भूमिका हिंदुत्ववाद्यांच्या पचनी पडली नाही
“ही भारतभूमी सर्वांना सामावून घेणारी आहे. कुणालाही न बदलविणारी, प्रत्येकाच्या पूजा पद्धतीचा सन्मान राखणारी आहे. या परंपरेला अनुरूप असेच हिंदूंनी स्वतःचे आचरण ठेवावे असेही सरसंघचालक म्हणतात. या देशातील हिंदूंचे आचरण परंपरेला साजेसेच आहे, पण हिंदूंची व मुसलमानांची डोकी भडकविण्याचे काम नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे. अयोध्येत रामजन्मभूमीवर मंदिर उभारणीच्या वेळी ‘‘यापुढे इतर मंदिर-मशिदींच्या वादात संघ पडणार नाही’’ अशी भूमिका सरसंघचालकांनी मांडली. ती संयमी भूमिका हिंदुत्ववाद्यांच्या पचनी पडली नाही,” असं शिवसेनेनं म्हटलंय.

अधिकृत यादी या हिंदुत्ववाद्यांनी प्रसिद्ध केली पाहिजे
“वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग आहे व ती जागा हिंदूंच्या ताब्यात यावी असे या मंडळींना वाटते. त्यामुळे देशातील वातावरण पुन्हा गढूळ होऊ शकते. शिवलिंग फक्त ज्ञानवापी मशिदीतच नाही, तर आग्र्यातील ताजमहालखाली व दिल्लीच्या लाल किल्ल्याखालीही असल्याने या दोन्ही वास्तू हिंदूंच्या ताब्यात द्याव्यात अशी मागणी भाजपापुरस्कृत हिंदुत्ववाद्यांनी केली. देशात नव्हे, तर जगभरात नक्की कोणत्या वास्तूखाली शिवलिंग आहे याची अधिकृत यादी या हिंदुत्ववाद्यांनी प्रसिद्ध केली पाहिजे,” असा टोला शिवसेनेनं लगावलाय.

अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेशवर आक्रमण करून मशिदी ताब्यात घ्यायचा विचार आहे काय?
“मुळात या शिवभक्तांनी एक विषय नीट समजून घेतला पाहिजे. शिवशंकर हे ज्या कैलास-मानसरोवर येथे विराजमान आहेत, ते कैलास- मानसरोवर आजही चीनच्या ताब्यात आहे व चीनच्या परवानगीशिवाय तेथे हिंदू श्रद्धाळूंना जाता येत नाही. त्यामुळे ज्ञानवापी मशीद, ताजमहाल, जामा मशीद, लाल किल्ल्याखालचे शिवलिंग शोधण्यापेक्षा शिवलिंगाचा निर्माता महादेव शंकराचे कैलास- मानसरोवर आधी ताब्यात घेतले पाहिजे. अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश हे भारताचाच भाग होते. तेथील अनेक मशिदींखालीही शिवलिंग असू शकेल. मग या देशांवर आक्रमण करून मशिदी ताब्यात घ्यायचा विचार आहे काय?,” असा प्रश्न शिवसेनेनं विचारलाय.

त्यांच्या खिजगणतीत हा आक्रोश व रक्तपात आहे काय?
“मशिदीखाली शिवलिंग आढळत असल्यामुळे हिंदुत्वाचे रक्षण करण्याची स्वयंभू जबाबदारी काही मंडळींनी घेतली आहे. प्रत्येक मशीद व दर्ग्याखाली ते शोध घेत आहेत, पण त्यामुळे कश्मीरातील हिंदूंचा रक्तपात कसा थांबणार? मशिदीखालच्या शिवलिंगाचा शोध घेण्यापेक्षा कश्मीर खोऱ्यातील हिंदूंचा रक्तपात थांबविणे गरजेचे आहे. कश्मीर खोऱ्यात हिंदूंच्या बाबतीत १९९० सालासारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. हिंदू नागरिकांना घरात व कार्यालयात घुसून मारले जात आहे. हिंदूंनी पुन्हा एकदा कश्मीरातून पलायन सुरू केले आहे. शिवलिंग शोधण्याच्या मोहिमा राबविणाऱ्यांच्या खिजगणतीत हा आक्रोश व रक्तपात आहे काय?,” असा सवाल अग्रलेखात उपस्थित करण्यात आलाय.

मुस्लिम समाजानेही भारत ही मातृभूमी म्हणून…
“कश्मीर खोऱ्यांत हिंदूच नव्हे, तर मुसलमानदेखील मारला जातोय. मुसलमान पोलीस अधिकाऱ्यांना ‘टार्गेट’ केले जात आहे. मंदिर-मशिदीवर तणाव निर्माण करून कश्मीरचा रक्तपात कमी होणार नाही. कश्मीरचा सध्याचा प्रश्न फक्त हिंदूंपुरताच मर्यादित नाही. तेथे देशासाठी मुसलमानांचेही बलिदान सुरूच आहे. देशाच्या प्रत्येक स्वातंत्र्य लढ्यात हिंदूंसोबत राष्ट्रीय वृत्तीचे मुस्लिम लढले आहेत. अश्फाकउल्ला खान, इब्राहिमखान गारदी हे येथील मुस्लिमांसाठी आदर्श आहेत. त्यांचा संबंध भारताशी आहे, बाहेरील राष्ट्रांशी नाही. मुस्लिम समाजानेही भारत ही मातृभूमी म्हणून स्वीकारली आहे, येथील सर्वसमावेशक भारतीय संस्कृती स्वीकारली आहे, असे सरसंघचालकांनी अधोरेखित केले. हा विचार सध्याच्या वातावरणात मोलाचा आहे,” असं शिवसेनेनं म्हटलंय.

सरसंघचालकांनी आता जे सांगितले त्यापासून तरी…
“भागवत यांनी कान टोचले हे खरेच, पण कान टोचून काही उपयोग होईल का? की ‘नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे’ असेच पुन्हा घडणार आहे. मशिदींखालचे शिवलिंग हा जसा काही जणांसाठी चिंतेचा विषय आहे, तसा मग पोर्तुगीज आक्रमकांनी गोव्यासारख्या राज्यात मंदिरे पाडून तेथे त्यांचे चर्च उभारल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्या चर्चखालीही शिवलिंग शोधायचे काय? म्हणूनच सरसंघचालकांनी जे सांगितले त्यावर अंमल व्हावा अन्यथा तणाव आणि स्फोटांचे भय कायम राहील. मशिदींखाली शिवलिंगाचा शोध घेणारे सरसंघचालकांनी आता जे सांगितले त्यापासून तरी बोध घेणार आहेत का?,” असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.