scorecardresearch

“महागाईचा तडाखा सामान्य जनतेला तुमच्या ‘महाशक्ती’ने दिला आहे, त्यावर…”; गॅसदरवाढीवरुन शिवसेनेची भाजपावर टीका

“नवसत्ताधाऱ्यांनी ‘पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करून राज्यातील सामान्य जनतेला दिलासा देऊ,’ अशी शेखी मिरवली होती.”

Shivsena on Gas Price
शिवसेनेनं केली कठोर शब्दांमध्ये टीका (प्रातिनिधिक फोटो)

‘आत्ममग्न’ सरकार आणि ‘चिंतामग्न’ जनता अशी आपल्या देशाची सध्याची अवस्था असल्याची टीका शिवसेनेनं बुधवारी झालेल्या गॅसदरवाढीसंदर्भात चिंता व्यक्त करताना केलीय. राज्यामध्ये सत्तेत आलेल्या शिंदे सरकारने पेट्रोल डिझेल स्वस्त करण्यासंदर्भातील संकेत दिल्यानंतर लगेच गॅसचे दर वाढल्याचा संदर्भही शिवसेनेनं जोडला आहे. २०२४ च्या निवडणुकीच्या दृष्टीने राजकारण करण्यात भाजपा मग्न असून सर्वसामान्य मात्र महागाईमध्ये भरडला जात असल्याचं शिवसेनेनं म्हटलंय.

नक्की वाचा >> “मनमोहन सिंग यांच्या काळात गॅस ४५० रुपयांना होता; मोदीजी, आता १०५३ रुपयांचा सिलेंडर किती लोकांना परवडणार?”

“केंद्रातील राज्यकर्ते सध्या राज्या-राज्यांतील विरोधकांची सरकारे अस्थिर करण्यात मग्न आहे. त्यामुळे दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे ‘चिंतामग्न’ झालेल्या सामान्य माणसाची काळजी वगैरे करण्याशी त्यांचा संबंध राहिलेला नाही. देशातील महागाईने मागील आठ वर्षांतील उच्चांक तर गाठलाच आहे, पण त्या उच्चांकात भरच घालण्याचे काम सध्याचे सत्ताधारी करीत आहेत. स्वयंपाकाच्या गॅसचे सिलेंडर बुधवारी ५० रुपयांनी महाग झाले. त्यामुळे घरगुती गॅस सिलेंडरची किंमत मुंबईमध्ये १ हजार ५२ रुपयांच्या वर गेली आहे. गेल्या वर्षभरात घरगुती सिलेंडरच्या किंमती ८३४.५० रुपयांवरून १०५२ रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. म्हणजे एका वर्षात तब्बल २१८.५० रुपयांचा वाढीव बोजा प्रत्येक कुटुंबाच्या बजेटवर पडला आहे,” असं शिवसेनेनं म्हटलंय.

“फक्त गॅस सिलेंडर महाग झाले आहे असे नाही तर नव्या गॅस कनेक्शनसाठीदेखील प्रति सिलेंडर ७५० रुपयांची वाढ केली आहे. जे रेग्युलेटर आधी दीडशे रुपयांना मिळत होते ते आता २५० रुपयांना मिळणार आहे आणि पाच किलोच्या सिलेंडरसाठी असलेली सुरक्षा ठेवदेखील ८०० रुपयांऐवजी ११५० रुपये करण्यात आली आहे. थोडक्यात, तुम्ही जुने गॅसग्राहक असा अथवा नवे, तुम्हाला गॅस दरवाढीचे चटके सहनच करावे लागणार आहेत. आधीच सर्व प्रकारच्या महागाईने सामान्य कुटुंबाचे दैनंदिन बजेट कोलमडले आहे, त्यात गॅस सिलेंडर मागील तीन महिन्यांत दुसऱ्यांदा महाग करण्याचा ‘विक्रम’ या सरकारने केला आहे,” असा टोला शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून लागवलाय.

“काही महिन्यांपूर्वी खाद्यतेल, मसाल्याच्या पदार्थांनीही किमतींचा उच्चांक गाठला होता. आता त्या किमती काही प्रमाणात कमी झाल्या असल्या तरी त्याचा वापर असलेल्या उत्पादनांच्या किंमती उत्पादक कंपन्यांनी ‘जैसे थे’च ठेवल्या आहेत. त्यामुळे खाद्यतेल, पामतेल यांच्या किमती कमी होऊनही त्याचा कुठलाच फायदा सामान्यांना मिळालेला नाही. केंद्र सरकार मात्र खाद्यतेल, कच्चे तेल, पामतेल स्वस्त केल्याचे ढोल वाजविण्यात मग्न आहे. खाद्यतेलाच्या अंतर्गत उत्पादनवाढीकडे दुर्लक्ष केल्यानेच आजही आपल्याला आयातीवर अवलंबून राहावे लागत आहे. त्याचाच परिणाम मध्यंतरी खाद्यतेलांच्या किमती अवाच्या सवा वाढण्यात झाला होता. त्यात ‘नोमुरा’ या जागतिक रेटिंग एजन्सीने भारतात येणाऱ्या दिवसांत अन्नधान्य महागाई दर 9 टक्क्यांच्या वर जाण्याची भीती व्यक्त केली आहे. म्हणजे महागाईचा विळखा यापुढे आणखी घट्ट होणार आहे,” असं शक्यता शिवसेनेनं व्यक्त केलीय.

“पुन्हा जीएसटीचे जे भूत दरवाढीच्या रूपाने सामान्य माणसाच्या मानगुटीवर बसले आहे, तेही उतरायची शक्यता नाही. जीएसटीमुळे केंद्र सरकारची तिजोरी मागील काही महिन्यांपासून ‘अब्जच्या अब्ज उड्डाणे’ घेत आहे. पण सामान्य माणसाच्या खिशातील उरलेसुरले किडुकमिडुकदेखील हे जीएसटीचे भूत ओरबाडून घेत आहे, त्याचे काय?,” असा प्रश्न शिवसेनेनं विचारलाय.

“महाराष्ट्रात बेइमानीने स्थापन झालेल्या सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावेळी नवसत्ताधाऱ्यांनी ‘पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करून राज्यातील सामान्य जनतेला दिलासा देऊ,’ अशी शेखी मिरवली होती. त्या दिलाशाचे सोडा, आता स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर पुन्हा महाग करून जो महागाईचा तडाखा सामान्य जनतेला तुमच्या त्या ‘महाशक्ती’ने दिला आहे, त्यावर तुमचे काय म्हणणे आहे? मागील आठ वर्षांतील उच्चांकी महागाईने देशातील सामान्य जनता जगण्या-मरण्याच्या कोंडीत सापडली आहे. या कोंडीतून तिला ज्यांनी बाहेर काढायचे ते महागाई कमी करण्याऐवजी विरोधकांची सरकारे अस्थिर करण्यात, २०२४ मध्ये स्वपक्षाला ‘स्थिर’ करण्यात आणि देशाला जागतिक लिडर वगैरे कसे केले या ‘आत्मानंदा’त मशगुल आहेत. ‘आत्ममग्न’ सरकार आणि ‘चिंतामग्न’ जनता अशी आपल्या देशाची सध्याची अवस्था आहे! ती कधी आणि कशी बदलणार हा प्रश्नच आहे,” असंही शिवसेनेनं म्हटलंय.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-07-2022 at 08:13 IST

संबंधित बातम्या