कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुद्द्यावरुन शिवसेनेनं भाजपावर निशाणा साधला आहे. पाकिस्तानमध्ये लपून बसलेला दाऊद हा राजकारणाऱ्यांना निवडणुकांच्या कालावधीमध्ये आठवतो असा टोला लगावतानाच दाऊद गँगला मुंबई पोलिसांनी संपवलं असलं तरी राजकारण्यांनी त्याला जिवंत ठेवलंय असंही शिवसेनेनं म्हटलंय. केंद्र सरकार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा थेट उल्लेख करत शिवसेनेनं दाऊद प्रकरणावरुन भाजपावर आणि केंद्रीय नेतृत्वावर निशाणा साधलाय.

नेहमीप्रमाणेच केंद्राचे संपूर्ण मंत्रिमंडळ प्रचारात
“महाराष्ट्रात आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा सुरूच आहे व त्यात सामान्य जनतेला अजिबात रस नसल्याचे बोलले जात आहे. राज्यात व देशात प्रश्नांची कमी नाही. हे प्रश्न सोडविण्यासाठी लोकांनी सरकारे निवडून दिली आहेत हे कोणीतरी दिल्लीत मोदींना व महाराष्ट्रात भाजपा पुढाऱ्यांना सांगण्याची वेळ आली आहे. देशाचा कारभार सोडून पंतप्रधान व गृहमंत्री चार-पाच राज्यांच्या विधानसभा प्रचारात गुंतून पडले आहेत. बेफाम आरोपांचा चिखल तुडवीत आणि उडवीत आहेत. अनेक केंद्रीय मंत्र्यांवर विधानसभा प्रचाराची धुरा दिली आहे. नेहमीप्रमाणेच केंद्राचे संपूर्ण मंत्रिमंडळ उत्तर प्रदेश, पंजाब, मणिपुरात, उत्तराखंडात अडकून पडले. अशातच कश्मीरातील शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला असून त्यात उत्तर प्रदेशमधील संतोष यादव आणि महाराष्ट्राचा सुपुत्र रोमित चव्हाण असे दोन जवान शहीद झाले आहेत. हे दुःखद व तितकेच संतापजनक आहे,” असं शिवसेनेनं म्हटलं.

Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड
Attack on NIA West Bengal
पश्चिम बंगालमध्ये ‘एनआयए’च्या पथकावर हल्ला; वाहनांची तोडफोड, दोन अधिकारी जखमी
Yavatmal Shivsena Thackeray
यवतमाळ : शिवसेना ठाकरे गटात निवडणुकीच्या तोंडावर संघटनात्मक बदल; अनुभवी व जुन्या शिवसैनिकांना दूर सारत नवीन कार्यकर्त्यांना संधी

ऊठसूट दिल्या जाणाऱ्या बातम्या भारताची बेअब्रू करणाऱ्या
“देशातील अनेक भागांत दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. एनआयएची म्हणे अशी माहिती आहे की, मुंबई-दिल्लीतील अनेक राजकीय नेते व शहरे दाऊद इब्राहिमच्या निशाण्यावर आहेत. आता दाऊदच्या निशाण्यावर भारतासारखा मोठा देश आणखी किती काळ असणार ते ठरवायला हवे. दाऊद पाकिस्तानात आहे व त्यास फरफटत आणण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. दाऊदला पाकिस्तानचे कवच आहे व ते राहणार, पण भारताचे सरकार ते कवच का तोडू शकले नाही? दाऊद भारतावर हल्ला करीत असल्याच्या ऊठसूट दिल्या जाणाऱ्या बातम्या भारताची बेअब्रू करणाऱ्या आहेत,” असं सामनामधून शिवसेनेनं म्हटलंय.

दिल्लीतील सरकार जागेवर आहे काय?
“दाऊद गँगचे कंबरडे मुंबई पोलिसांनी कधीच मोडले आहे. महाराष्ट्राचे पोलीस असे दाऊदी हल्ले उद्ध्वस्त करण्यास समर्थ आहेत, पण पाकिस्तानचे नरडे दाबण्याची ताकद दिल्ली सरकारमध्ये आहे काय? अहमदाबाद येथे जुलै २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेतील ३८ आरोपींना अहमदाबादच्या विशेष न्यायालयाने शुक्रवारी सामुदायिक फाशी ठोठावली, पण त्या बॉम्बस्फोटांतील प्रमुख आरोपींना पकडून त्यांचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्याचे काम सगळ्यात आधी मुंबई पोलिसांनीच केले आहे. त्यामुळे दाऊद वगैरेंचे काय करायचे ते पाहता येईल. दिल्लीतील सरकार जागेवर आहे काय? हाच खरा प्रश्न आहे,” असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

यावर सध्या कोणीच बोलत नाही
“सरकार जागेवर नाही. सदैव निवडणूक प्रचारात व विरोधी पक्षाला त्रास देण्याच्या राष्ट्रकार्यात गुंतलेले आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा उघडय़ावर पडली आहे. तिकडे कश्मीरात आमचे जवान शहीद होत आहेत. दाऊद दिल्ली-मुंबईवर हल्ला करण्याच्या योजना आखत आहे. हे सर्व प्रकार कमजोर केंद्र सरकारची लक्षणे आहेत. देशात ‘हिजाब’वरून मारामाऱ्या सुरू आहेत, पण दाऊद हल्ले करणार यावर फक्त इशारे देण्याचे काम सुरू आहे. दाऊद हल्ले करणार म्हणजे पाकिस्तान भारताची कुरापत काढणार, हा त्यामागचा सरळ अर्थ आहे. पाकिस्तानच्या तुरुंगात आपले कुलभूषण जाधव खितपत पडले आहेत. त्यांचे पुढे काय होणार, यावर सध्या कोणीच बोलत नाही,” अशी खंत लेखामधून व्यक्त करण्यात आलीय.

निवडणुका आल्या की, ही मंडळी…
“केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर प्रदेशच्या निवडणूक प्रचारात काय सांगावे, तर उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी सत्तेवर आली तर अतिरेकी व आतंकवादाचा पुरवठा वाढेल. म्हणजे या देशात नोंदणी झालेला एक राजकीय पक्ष देशात आतंकवादास खतपाणी घालत आहे. मग मोदींचे सरकार व गृहमंत्री इतकी वर्षे हा आतंकवादाचा पुरवठा डोळे उघडे ठेवून का पाहत आहेत? निवडणुका आल्या की, ही मंडळी आपल्या पेटाऱ्यातून दाऊदचा नागोबा बाहेर काढतात व आतंकवादाची पुंगी वाजवत बसतात. हे आता नेहमीचेच झाले,” असा टोला शिवसेनेनं लगावलाय.

‘पुलवामा’चे लष्करी हत्याकांड कोणी घडवले?
“पाकिस्तानात संपलेला दाऊद आपल्याकडील तपास यंत्रणा व राजकारण्यांनी त्यांच्या राजकीय सोयीसाठी जिवंत ठेवला आहे. दाऊद वगैरे टोळय़ांत आता काही घडवायचा दम उरलेला नाही. ‘पुलवामा’चे लष्करी हत्याकांड कोणी घडवले? त्यात तर आपल्याच सुरक्षा यंत्रणेतील रहस्यमय चुका दिसतात. लडाखमध्ये चिनी सैन्य घुसले आहे ते कोणाच्या दुबळेपणामुळे? त्यांच्यावर हल्ला करायचे सोडून मुंबईतले टिनपाट भाजपा दलाल राजकीय विरोधकांवर हल्ले करत आहेत व अशा हल्लेखोरांना केंद्र सरकार सुरक्षा कवच देत आहे. पंजाबातील निवडणुकांत आजही खलिस्तानवर चर्चा होते. सत्ताधारी व राजकारणी धडधडीत खोटं बोलतात,” असं शिवसेनेनं म्हटलंय.

हे डावपेच राष्ट्राला खोल अंधाऱ्या गुहेत ढकलत आहेत
“महाराष्ट्रातही भाजपा व त्यांच्या पंटर्सनी खोटेपणाचा कळस गाठला आहे. सरकारला काम करू द्यायचे नाही व बदनामीच्या मोहिमा चालवायच्या. महाराष्ट्राविरुद्ध गरळ ओकणाऱ्यांना केंद्र सरकारने संरक्षण द्यायचे. महागाई, बेरोजगारी, चीनचा हल्ला व कश्मीरातील सैनिकांचे बलिदान यावर कोणी बोलू नये, यासाठी सुरू असलेले हे डावपेच राष्ट्राला खोल अंधाऱ्या गुहेत ढकलत आहेत,” असं या लेखाच्या शेवटी म्हटलंय.