देशातील अनेक भागांमध्ये टोमॅटोचे दर शंभरी पार गेल्याचा विषय चांगलाच चर्चेत आहे. यावरुनच आता शिवसेनेने महागाईचा मुद्दा उपस्थित करत केंद्रामध्ये सत्तेत असणाऱ्या मोदी सरकारवर निशाणा साधालाय. देशातील महागाई प्रचंड प्रमाणामध्ये वाढली असून सत्ताधारी मात्र यासंदर्भात काहीच बोलायला तयार नसल्याचं चित्र दिसत असल्याचं म्हणत शिवसेनेनं सत्ताधाऱ्यांवर टीका केलीय.

“‘बहोत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार’ या व अशा लोकप्रिय घोषणांच्या माध्यमातून देशातील जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत सात वर्षांपूर्वी केंद्रात सत्तेत आलेल्या भाजपा सरकारला आपल्या तमाम घोषणांचा आता विसर पडला आहे. देशातील महागाई नियंत्रणाबाहेर गेली आहे आणि जीवनावश्यक वस्तूंसह सर्वच क्षेत्रांमध्ये महागाईचा जबरदस्त भडका उडाल्याने सामान्य जनतेचे जगणे असह्य झाले आहे. मात्र, दिल्लीच्या तख्तावर विराजमान झालेल्या सत्तारूढ पक्षाचा एकही नेता-प्रवक्ता महागाईच्या मुद्दय़ावर आता तोंड उघडायला तयार नाही. अन्नधान्य, खाद्यतेल, पेट्रोल-डिझेल, बियाणे-खते, स्वयंपाकाचा गॅस, चहा-साखर, डाळी, पीठ-मीठ आणि आता तर भाजीपालाही प्रचंड महागला आहे. तेल आणि डाळींबरोबरच भाज्यांच्या दरवाढीमुळे महिलावर्गाचे स्वयंपाकघराचे बजेट पार कोलमडून गेले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती हेच महागाईचे मूळ आहे आणि त्यामुळेच देशभरात महागाईचा आगडोंब उसळला आहे,” असा उल्लेख ‘सामना’च्या अग्रलेखामध्ये करण्यात आलाय. इतकेच नाही तर पुढे, “दिवसेंदिवस उग्ररूप धारण करत असलेल्या महागाईच्या गंभीर विषयावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी धार्मिक उन्माद आणि जातीय विद्वेषाच्या भलत्यासलत्या विषयांत जनतेला गुंग करण्याचे खेळ सरकारकडून खेळले जात आहेत,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

“इंधनावरील खर्च वाढला की, प्रत्येक वस्तूच्या वाहतुकीचा खर्च वाढतो हे आर्थिक दुष्टचक्र सर्वश्रुत आहे. वाहतूक खर्चातील वाढीमुळे महागाई उसळी घेते आणि वाढीव इंधन खर्चाचा एकन्एक पैसा शेवटी सर्वसामान्य ग्राहकाच्याच खिशातून वसूल केला जातो. गेल्या सात वर्षांत झालेली इंधनाची जबर दरवाढ हेच महागाईच्या भरारीचे मुख्य कारण आहे. केंद्र सरकारच्याच वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशातील घाऊक महागाईचा निर्देशांक सातत्याने वाढतो आहे. ऑक्टोबरमध्ये देशभरातील घाऊक महागाई निर्देशांक तब्बल १२.५४ टक्क्यांवर पोहोचला. घाऊक महागाईचा निर्देशांक दोन अंकी म्हणजे १० टक्के पिंवा त्याहून अधिक नोंदवला जाण्याचा हा सलग सातवा महिना आहे. महागाईने जुन्या सरकारच्या कालखंडातील तमाम विक्रम मोडीत काढून महागाईच्या बाबतीत नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे,” असंही महागाईसंदर्भात चिंता व्यक्त करताना लेखात म्हटलंय.

“अनेक भाज्या तर आता सफरचंदापेक्षा अधिक दराने विकल्या जात आहेत. वाटाणा आणि टोमॅटो तर हिवाळ्याच्या हंगामात खूप स्वस्तात विकले जाते. मात्र, आज या दोन्ही वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. हिवाळ्यात २५ रुपये किलोने मिळणारा टोमॅटो आता १०० रुपये किलोवर पोहोचला आहे. अंदमान-निकोबारमध्ये तर टोमॅटो ११३ रुपये किलो म्हणजे पेट्रोलपेक्षाही महाग विकला जात आहे. वाटाणाही १५० ते २०० रुपये किलोने विकला जात आहे,” असा उल्लेख लेखात आहे.

“देशाच्या अनेक भागांत लांबलेल्या पावसाने आणि अतिवृष्टीमुळे यंदा पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. खासकरून दक्षिणेकडील राज्यांतून होणारी टोमॅटोची आवक घटली. त्यामुळे टोमॅटोच्या भावाने शंभरी गाठली, असे सांगितले जात आहे. ते खरे असेलही, मात्र प्रश्न केवळ टोमॅटोचा नाही, सर्व प्रकारचा भाजीपाला आणि सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर जनतेच्या आवाक्यापलीकडे गेले आहेत. करोनाकाळात आधीच जनतेचे उत्पन्न कमी झाले, अनेकांच्या हातचा रोजगार हिरावला गेला. त्यात महागाईची अशी कुऱ्हाड कोसळत असल्याने सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्कील झाले आहे. करोना सुरू झाल्यापासून केवळ खाद्यतेलांचे भाव किलोमागे सरासरी ४० रुपयांनी वाढले आहेत. डाळी, कडधान्यांचे दरही सातत्याने वाढत आहेत,” असं शिवसेनेनं म्हटलंय.

“दिवसेंदिवस भरारी घेणारी महागाई आणि भाववाढीच्या हल्ल्यांनी देशातील सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली आहे. महागाईच्या वणव्यात जनता होरपळून निघत असताना सरकार पक्षाने मात्र तोंडाला कुलूप लावले आहे. एरवी महागाईच्या प्रश्नावर कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत आकाशपाताळ एक करणारी मंडळी आज सत्तेच्या सिंहासनाचे सुख उपभोगत आहे. महागाईच्या मुद्दय़ावर सत्ताधारी पक्षात सन्नाटा पसरलेला असला, तरी नजीकच्या काळात हेच मौन महागाईच्या आगडोंबात भस्मसात झाल्याशिवाय राहणार नाही,” असंही लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.