scorecardresearch

“जोधपूरमध्ये दंगल सुरू असताना देशाचे पंतप्रधानही…”; राहुल गांधींवरील टीकेनंतर भाजपाला शिवसेनेचे प्रत्युत्तर

राहुल गांधी हे राजकारणात गंभीर आहेत की नाही याबाबत त्यांचा काँगेस पक्ष निर्णय घेईल, असेही शिवसेनेने म्हटले आहे.

ShivSena Slams Bjp Over rahul Gandhi night club viral video
(फोटो – @MEAIndia)

काँग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची नाइट क्लबमध्ये पार्टी करत असल्याची चित्रफीत प्रसारित झाल्याने मंगळवारी काँग्रेसची मात्र पुरती कोंडी झाली. सध्या राहुल गांधी नेपाळमध्ये खासगी दौऱ्यावर असून ते पत्रकाराच्या लग्न समारंभात सहभागी झाले आहेत. नेपाळमधील पंचतारांकित हॉटेलच्या नाइट क्लबमध्ये राहुल गांधी पार्टी करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपाने काँग्रेसच्या माजी पक्षाध्यक्षांवर टीकेचा भडिमार केला आहे. यावरुन आता शिवसेनेने पंतप्रधान मोदींसह भाजपावर निशाणा साधला आहे. देशातील राजकारणाचा आणि चर्चेचा स्तर कमालीचा घसरला आहे, असे सामनाच्या अग्रलेखातून म्हटले आहे.

राजकारणातील माणसांची उंची आज राहिली नाही

“देशातील राजकारणाचा आणि चर्चेचा स्तर कमालीचा घसरला आहे. राजकारणातील माणसांची उंची आज राहिली नाही. त्यामुळे विचारांना, वैयक्तिक स्वातंत्र्यास महत्त्व राहिलेले नाही. नेपाळमध्ये खासगी भेटीवर गेलेले राहुल गांधी एका नाईट क्लबमध्ये पोहोचले व पार्टीत सहभागी झाले यावर भाजपाने चर्चा सुरू केली. देशात इतके भयंकर प्रश्न निर्माण झाले असताना राहुल गांधी नेपाळमधील नाईट क्लबमध्ये कसे काय जाऊ शकतात? असा प्रश्न उपस्थित केल्याने काँगेस पक्षाची अडचण झाली आहे. भाजपाने काँग्रेसवर टीकेचा भडिमार केला आहे. जे लोक देशात हिजाबपासून भोंग्यापर्यंत कसलेही राजकारण करू शकतात, त्यांच्याकडून दुसरी कोणतीच अपेक्षा करता येणार नाही. राहुल गांधी हे नेपाळमध्ये पत्रकार मित्राच्या लग्नासाठी गेले आहेत. इतर कोणी राजकीय नेते अशा खासगी दौऱ्यावर जात नाहीत का? व गेल्यावर पंचतारांकित हॉटेल्समधल्या पार्टीजना हजर राहत नाहीत का?,” असा सवाल अग्रलेखातून करण्यात आला आहे.

जोधपुरात दंगल सुरू असताना देशाचे पंतप्रधानही परदेश दौऱ्यावर

“भाजपाचा सवाल असा आहे की, राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असून जोधपूरमध्ये हिंसा होत आहे. त्याबद्दल राहुल गांधी यांना चिंता वाटत नाही का? उलट ते नाईट क्लबमध्ये पार्टी करत आहेत. जोधपूरमध्ये दंगलसदृश परिस्थिती आहे. जोधपूर हा देशाचाच भाग आहे. दंगली घडाव्यात असे वातावरण कोण निर्माण करीत आहे? जोधपुरात दंगल सुरू असताना देशाचे पंतप्रधानही परदेश दौऱ्यावरच आहेत व ते रशिया आणि युक्रेनमधील सुरू असलेली दंगल मिटविण्यासाठी पुढाकार घेत आहेत. पण देशातील दंगलसदृश स्थितीवर ते काहीच बोलत नाहीत. काश्मीर खोऱ्यातील अनेक भागांत रमजान ईदच्या दिवशी दंगली झाल्या, सुरक्षा दलावर हल्ले झाले. ही परिस्थिती भाजपाला चिंताजनक वाटू नये याचे आश्चर्य वाटायला हवे,” असे सामनाच्या अग्रेखात म्हटले आहे.

देशातील लोकशाही व स्वातंत्र्य अधोगतीस नेण्याचा प्रयत्न

“काश्मीरची दंगल मोदींमुळे भडकली नाही, तशी जोधपूरची दंगल राहुल गांधींमुळे पेटली नाही, तरीही पंतप्रधान मोदी यांची जबाबदारी या प्रकरणात जास्त आहे. राहुल गांधी हे राजकारणात गंभीर आहेत की नाही याबाबत त्यांचा काँगेस पक्ष निर्णय घेईल, पण देशातील अनेक प्रश्नांबाबत मोदींचे सरकार किती गंभीर आहे? यावर आता चर्चा व्हायला हवी, पण चर्चेचा स्तर नाईट क्लबपर्यंत आणून ठेवल्यावर कसली चर्चा होणार? देशात जे वातावरण हिंदू संस्कृती व हिंदुत्वाच्या नावे निर्माण केले जात आहे ते हिंदू धर्माच्या मूलभूत स्वातंत्र्यावर हल्ला करणारे आहे. तालिबानी पद्धतीचे निर्बंध लादणे म्हणजे हिंदुत्व रक्षणाचे कार्य असा समज काही लोकांनी करून घेतला आहे. हिंदुत्वात माणुसकी, श्रद्धा, सत्य, ज्ञान, सचोटी इत्यादी गुणांची आवश्यकता असते. त्याचाच आज दुष्काळ पडलेला दिसतो. देशातील लोकशाही व स्वातंत्र्य अधोगतीस नेण्याचा प्रयत्न काही लोकांनी चालविला आहे. एक काळ असा होता की, सत्तेतून पैसा, पैशांतून पुन्हा सत्ता, पुन्हा पैसा हे चक्र सुरू होते. आज दंगलीतून सत्ता, पुन्हा दंगली, त्यातून पुन्हा सत्ता असे दुष्टचक्र फिरताना दिसते. पुन्हा त्यासाठी माणुसकी व धर्माचा मुडदा पडला तरी चालेल,” असे शिवसेनेने म्हटले आहे.

भाजपाच्या समर्थक धनिकांनी देशाचा खासगी क्लबच करून ठेवला

“देशात कोळशाचा तुटवडा आहे, राज्याराज्यांत विजेअभावी अंधकार आहे. त्याचा फटका उद्योग जगतास बसतो आहे. या सगळ्यास काय नेपाळच्या नाईट क्लबला गेलेले राहुल गांधी जबाबदार आहेत? भाजपाच्या समर्थक धनिकांनी देशाचा खासगी क्लबच करून ठेवला आहे. त्या क्लबमध्ये जनसामान्यांच्या प्रश्नांवर चर्चा होईल तर शपथ! देशातील सार्वजनिक संपत्ती मर्जीतल्या उद्योगपतींना विकून टाकली यास काय नेपाळचे नाईट क्लब जबाबदार आहेत? देशासाठी कुर्बान झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांना व लाखो माजी सैनिकांना एप्रिल महिन्याचे पेन्शन मिळू शकले नाही. वीज तुटवडा, नोकऱ्यांचा तुटवडा, शेतकऱ्यांच्या हमी भावाचा प्रश्न, महागाई, देशाच्या हद्दीत घुसलेले चिनी सैन्य यावर चर्चा करायचे सोडून भाजपा मंडळी आजही राहुल गांधींच्या नेपाळ दौऱ्यावर तीर मारीत आहेत. मोदींच्या काळात नव्या नोकऱ्या निर्माण झाल्या नाहीत. उलट सवादोन कोटी नोकऱ्यांत घट झाली. बेरोजगारांनी आता आशाच सोडली. नेपाळच्या नाईट क्लबमध्ये राहुल गांधी गेल्यामुळे ही स्थिती उद्भवली नाही, तर देशाचा जो क्लब करून ठेवला आहे, त्यामुळेच ही पडझड सुरू झाली आहे. देशात ही अभूतपूर्व परिस्थिती उद्भवली आहे,” असेही शिवसेनेने म्हटले आहे.

नवा भारत तो हाच आहे काय!

“दंगली, हिजाब, भोंगावाद यामुळे निवडणुकांचे राजकारण करता येईल, पण प्रश्न तसेच राहतील. देशाला आता कळस उरलेला नाही, पण पायाही खचतो आहे, व देश अंधाऱ्या गर्तेत ढकलला जातो आहे. त्या अंधारयात्रेवर चर्चा करण्याचे सोडून राहुल गांधी नाईट क्लबात गेले, त्यावर भोंगे वाजवले जात आहेत. नवा भारत तो हाच आहे काय!,” असा सवालही शिवसेनेने केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shivsena slams bjp over rahul gandhi night club viral video saamana agralekh abn

ताज्या बातम्या