“ममता बॅनर्जींच्या प्रतिमेला हे शोभणारं नाही”, ठाकरे गटानं विरोधकांना सुनावलं; म्हणे, “अशा वेळी…!”

“केंद्रीय तपास यंत्रणांनी महाराष्ट्राच्या बरोबरीने सगळ्यात जास्त उच्छाद मांडला तो प. बंगालात. ममता यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांचाही छळ सुरूच आहे, पण…!”

uddhav thackeray mamata banerjee
ठाकरे गटाचा ममता बॅनर्जींना 'सल्ला'! (संग्रहीत छायाचित्र)

एकीकडे केंद्रात मोदी सरकारने पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मोठ्या विजयासाठी प्रयत्न सुरू केले असतानाच दुसरीकडे भाजपाविरोधी पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्नही आकार घेऊ लागले आहेत. नितीश कुमार, शरद पवार, ममता बॅनर्दी, उद्धव ठाकरे अशा नेतेमंडळींनी उघडपणे अशा विरोधी पक्षांच्या आघाडीचं समर्थन केलं आहे. मात्र, विरोधकांमध्ये एकमत असल्याचं दिसत नसल्याचं चित्र निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं विरोधी पक्षांचे कान टोचले आहेत. तसेच, ममता बॅनर्जींच्या पक्षानं संसदेत घेतलेल्या भूमिकेवरून सूचक शब्दांत टीकाही केली आहे.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

“पंतप्रधानांनी किमान ‘मन की भडास’…!”

सामना अग्रलेखातून ठाकरे गटानं अदाणी समूह आणि हिंडेनबर्गचा अहवाल या मुद्यावर भूमिका मांडली आहे. या प्रकरणी केंद्रातील मोदी सरकार अदाणी समूहाला पाठिशी घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा सूर अग्रलेखात लावण्यात आला आहे. “अदानी प्रकरणात पंतप्रधानांनी ‘मन की बात’ व्यक्त करावी, निदान ‘मन की भडास’ व्यक्त करून विरोधकांवर हल्ला करावा, तर तेदेखील नाही. मग सरकार काय करते आहे? सरकार याप्रश्नी विरोधकांत फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे”, असा टोला अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

“विरोधकांच्या एकजुटीची वज्रमूठ हेच मोदी सरकारविरोधी सगळ्यात प्रखर हत्यार आहे. ते हत्यार बोथट करण्याचे, वज्रमूठ ढिली करण्याचे काम केंद्र सरकार करीत असले तरी ते यशस्वी होता कामा नये. मोदींचे सरकार प्रथमच संकटांच्या कोंडीत सापडले आहे, बदनाम झाले आहे. जनता हिशेब मागत आहे व मोदी यांची ‘मन की बात’ शांत आहे. अशा वेळेला विरोधी पक्षास शांत राहून कसे चालेल? ‘अदानी’ हा फुगा फुटला आहे. फुटलेल्या फुग्यात हवा भरण्याचे पाप निदान विरोधकांनी तरी करू नये”, असं म्हणत विरोधकांकडूनही हवा भरण्यास हातभार लावला जात असल्याची टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.

“…तेव्हा राहुल गांधी म्हणाले होते, हा फुगा लवकरच फुटेल, आता…”, अदाणी प्रकरणावरून ठाकरे गटाचा मोदी सरकारवर हल्लाबोल!

“मोदी सरकारने जवळ जवळ बहुतेक सार्वजनिक कंपन्यांचे खासगीकरण करून त्या अदानी यांच्या खिशात घातल्या. ‘सब भूमी गोपाल की’ याप्रमाणे ‘सब कुछ फक्त अदानींचे’ हेच धोरण मोदी सरकारने राबवले व देशाला संकटात ढकलले. देशाची सर्व संपत्ती एकाच उद्योगपतीकडे जाणे हा भांडवलशाहीचा कहर आहे, पण ‘केसीआर’ यावर जपून भाष्य करीत आहेत. मोदी यांना उद्देशून ते म्हणाले की, ‘जर तुम्ही इमानदार आहात तर अदानींची चौकशी करा.’ केसीआर यांनी ही मागणी केली असली तरी ते खुल्या मैदानात यायला तयार नाहीत”, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

ठाकरे गटाचा ममता बॅनर्जींना सल्ला!

“जे चंद्रशेखर राव यांचे तेच ममता बॅनर्जी व त्यांच्या तृणमूल काँग्रेसचे. केंद्रीय तपास यंत्रणांनी महाराष्ट्राच्या बरोबरीने सगळ्यात जास्त उच्छाद मांडला तो प. बंगालात. ममता यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांचाही छळ सुरूच आहे, पण या सर्व तपास यंत्रणा हिंडेनबर्गने फोडलेल्या फुग्याच्या बाबतीत गप्प आहेत. ममता व त्यांच्या पक्षाची लोकसभेत चांगली ताकद आहे व ते बहुधा याप्रश्नी कुंपणावर बसून आहेत. हे रहस्यच आहे. ममता बॅनर्जी यांच्या प्रतिमेस व झुंझारपणास हे शोभणारे नाही. ममता यांचे भांडण काँग्रेस पक्षाशी असू शकेल, पण हिंडेनबर्गने फोडलेला फुगा हा राष्ट्रीयदृष्टय़ा महत्त्वाचा विषय आहे. भाजप व त्यांच्या दैवतांचे मुखवटेच आता गळून पडले. ममता बॅनर्जी यांना बदनाम करणाऱ्या, त्यांचे सरकार अस्थिर करू पाहणाऱ्या या शक्तींना ताकद मिळेल असे वर्तन आता होऊ नये”, असा सल्ला ठाकरे गटाकडून ममता बॅनर्जींना देण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 08:34 IST
Next Story
विश्लेषण: पदवीदान समारंभात आता काळ्या गाऊनची जागा घेणार अंगवस्त्रम! पण या पोशाखाची सुरुवात नेमकी झाली कुठून?
Exit mobile version