उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी गोरखपुरमधील एका दलित कुटुंबाच्या घरी जेवणाचा आस्वाद घेतला. योगी आदित्यनाथ यांनी पक्षाचे कार्यकर्ता असणाऱ्या अमृतलाला भारती यांच्या घरी जेवण केलं. यावेळेस योगींनी सर्वांना संक्रांतीच्या शुभेच्छाही दिल्या. योगींच्या या फोटोची सोशल मीडियावर चांगली चर्चा आहे. असं असतानाच आता शिवसेनं या सर्व प्रकारावरुन भाजपा आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधलाय.

“योगी आदित्यनाथ यांनी दलिताच्या घरी जेवण घेतल्याची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. गोरखपूरचे खासदार मनोज तिवारी यांनीही त्याच वेळी दलिताघरी जेवण घेतल्याचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. दलिताला दलित म्हणून हिणवण्याचा हा राजकीय प्रकार आहे. हरिशंकर परसाई यांनी एकदा स्पष्टच सांगितले होते, ते त्यांच्याच शब्दांत देतो, ‘‘याद रहे, ‘जगजीवनराम’ को ‘उमाशंकर दीक्षित’ के साथ एक साथ डिनर खिलाने से कोई सामाजिक परिवर्तन नहीं होता.’’ गेल्या काही वर्षांपासून भाजप पुढाऱ्यांचा हा नवा सामाजिक परिवर्तनाचा फॉर्म्युला समोर आला आहे. पंतप्रधान मोदी यांनी कुंभमेळ्यात गंगास्नान केले व नंतर काही दलितांचे पाय वगैरे धुतल्याचे ‘नाट्य’ घडवले. त्यामुळे दलित, मजूर, सफाई कामगारांचे प्रश्न उत्तर प्रदेशात तरी सुटले काय?,” असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केलाय.

eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’
deputy leader of Shiv Sena Thackeray group Sushma Andhare criticized BJP
‘‘…हा तर भाजपाचा डीएनए, आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही” सुषमा अंधारे यांची टीका, म्हणाल्या…
Meenakshi Shinde
आचारसंहितेच्या कालावधीत बचतगटांना आनंद आश्रमातून अनुदान वाटप ? शिवसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
After the EPS-95 pensioners the Halba community also upset with BJP
इपीएस-९५ पेन्शनधारकानंतर ‘हलबा’ बांधवही सत्ताधाऱ्यांवर नाराज; म्हणाले, “भाजपला…”

“खास दलितांच्या घरी जेवण्याचा कार्यक्रम घडवणे म्हणजे दलितांच्या बाबतीत आपली वेगळी भूमिका आहे हे स्पष्ट करण्यासारखेच आहे. दलितांच्या घरी जेवायला जाणे, दलितांना सार्वजनिक कार्यक्रमांत आमंत्रित करणे हे कार्य सगळ्यात आधी कोकणातील वास्तव्यात वीर सावरकरांनी सुरू केले. एका बाजूला आपण जातीप्रथा संपविण्यासाठी सरकारी कार्यक्रम राबवायचे आणि त्याच वेळी एखादी व्यक्ती दलित आहे, अशी दवंडी पिटवून त्याच्या घरी भोजन मेळावा घ्यायचा हे उपक्रम राबविण्यात भाजपाचा हात कोणी धरणार नाही,” असं शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलंय.

“डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीला राजकीय स्वरूप देऊन तिच्यात आमूलाग्र क्रांती घडवून आणली. महात्मा फुले यांनी त्यांच्या वाडय़ातली विहीर दलितांसाठी खुली केली. महाडला जो चवदार तळ्याचा सत्याग्रह झाला त्यात डॉ. आंबेडकरांच्या चार पावले पुढे सुरबानाना टिपणीस वगैरे प्रमुख लोक होते. प्रबोधनकार ठाकरे यांनी अशा समाजोद्धाराच्या कामात नेहमीच पुढाकार घेतला. आध्यात्मिकदृष्ट्या हिंदू धर्मात काही दोष आहेत. सर्वात मोठा दोष म्हणजे चातुर्वर्ण्य. चातुर्वर्ण्य पद्धतीचे समर्थन संघाच्या धुरिणांनी अनेकदा केले म्हणूनच ते दलितांना वेगळे मानून त्यांच्या घरी जेवण्याचे कार्यक्रम साग्रसंगीत करीत असतात. एकाने विद्या शिकावी, दुसऱ्याने शस्त्र धरावे, तिसऱ्याने व्यापार करावा आणि चौथ्याने हलक्या दर्जाची सेवा करावी ही व्यवस्था व्यक्तीच्या आत्मोन्नतीला मुळीच पोषक नाही. भाजपाच्या पुढाऱ्यांना आजही दलितांकडे दलित म्हणून जेवणाचे कार्यक्रम करून त्याचा बोभाटा करावा लागतो याचा सरळ अर्थ असा की, त्यांच्या मनात ‘जात’ आहे व ती जात घालवायची त्यांची तयारी नाही,” असं शिवसेनेनं म्हटलंय.

“आज साराच देश राजकीय फायद्या-तोट्यासाठी जातीय चौकटीत वाटला गेला आहे. त्यामुळे जातीपातीचे निर्मूलन हे थोतांड ठरले आहे. आर्थिक आणि सामाजिकदृष्टय़ा मागास असलेल्या समाजघटकांचे ठीक आहे, आज सगळ्यांनाच नोकरी, शिक्षणात प्राधान्य हवे आहे. निवडणुकांतदेखील जातीची खोटी प्रमाणपत्रे वापरून लोकांची दिशाभूल केली जाते व नंतर त्यांच्या निवडणुका कोर्टाकडून रद्द केल्या जातात. अशाने समाज कसा पुढे जाईल? महाराष्ट्र जातीप्रथेविरोधात लढत राहिला. जोतिबा फुले यांनी १८७३ मध्ये ‘गुलामगिरी’ या मथळ्याखाली लिहिलेल्या लेखात ‘जातीभेदांचे थोतांड’ असा शब्दप्रयोग वापरला. १८१८ साली पेशवाई बरखास्त झाली. पेशवाईत जातीभेदासंबंधीचे सर्व दुष्ट प्रकार अस्तित्वात आले होते. त्या स्थितीवर पहिले प्रहार लोकहितवादींनी केले. त्यानंतर न्या. महादेव गोविंद रानडे यांनी तोच विचार पुढे नेला,” असा उल्लेख अग्रलेखात आहे.

“लोकमान्य टिळकांनी राजकीय सुधारणांवर भर दिला तर आगरकरांनी सामाजिक सुधारणांना अग्रहक्क देण्याचा विचार मांडला. आगरकर सांगतात, ‘‘जातीमुळे आपला देशाभिमान संकुचित झाला आहे. जातीमुळे ज्ञान, कला, शास्त्र वगैरे तेथल्या तेथे कोंडल्यासारखी झाली आहेत. जातींमुळे सर्व आचारात व विचारात मतभेद निर्माण होऊन ती परस्पर वैरास, छळास आणि मत्सरास कारण ठरली आहेत. जातींमुळे अन्न-व्यवहार-विवाह वगैरेंच्या संबंधात कितीतरी गैरसोय झाली आहे. जातीभेदांमुळे आमची भुतदया, आमचे बंधुप्रेम, आमची उदारता, आमची धर्मबुद्धी, आमची परोपकार वृत्ती, आमचे विचार यांचे क्षेत्र कितीतरी मर्यादित झाले आहे, याची कल्पना लोकांना येत नाही.’’ आगरकरांनी हे सांगून दशके लोटली, पण आज परिस्थिती काय आहे? आजही मतदारसंघांमध्ये जातीची गणिते पाहून उमेदवाऱ्या दिल्या जातात. जातीस महत्त्व देऊन मुख्यमंत्री, पंतप्रधान जेवणावळीचा कार्यक्रम करतात. मनातून जात जायला तयार नाही आणि निघालेत सामाजिक परिवर्तन घडवायला,” म्हणत शिवसेनेनं भाजपावर निशाणा साधलाय.