देशात भाजपासमोर यूपीएशिवाय नवी विरोधकांची आघाडी उभी करण्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. ममता बॅनर्जींच्या मुंबई दौऱ्यातून त्याचा ‘शुभारंभ’ झाल्याचं देखील बोललं जात आहे. खुद्द शरद पवारांनी त्याला दुजोरा दिल्यामुळे आणि पवारांसमोरच ममतादीदींनी “देशात यूपीए अस्तित्वात नाही”, असं विधान केल्यामुळे त्याला दुजोराच मिळाला आहे. पण शिवसेनेने मात्र काँग्रेसच्याच नेतृत्वाखालील यूपीएचं जोरदार समर्थन केलं आहे. सामनामधील अग्रलेखातून काँग्रेसला वगळून नवीन आघाडी उभी करण्याच्या प्रयत्नांवर आक्षेप घेण्यात आला आहे.

दुसरी आघाडी म्हणजे भाजपाला मदत

देशात यूपीएला वगळून दुसरी आघाडी उभी करणं म्हणजे भाजपाला मदत करण्यासारखंच असल्याची भूमिका सामनाच्या अग्रलेखात मांडण्यात आली आहे. “मोदींच्या पक्षाला आज एनडीएची गरज नाही, पण विरोधकांना यूपीएची गरज आहे, यूपीए समांतर दुसरी आघाडी स्थापन करणे हे भाजपाचे हात बळकट करण्यासारखेच आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए कुणाकुणाला मान्य नाही, त्यांनी जाहीरपणे हात वर करावेत. पडद्यामागून गुटरगूं करू नये”, असं शिवसेनेकडून सुनावण्यात आलं आहे.

“…तर भाजपाला समर्थ पर्याय द्यायच्या बाता कुणी करू नयेत”, शिवसेनेनं विरोधकांनाच दिल्या कानपिचक्या!

चर्चेतच वेळेचा अपव्यय

दरम्यान, विरोधकांच्या आघाडीसंदर्भातल्या चर्चेतच वेळ घालवला जात असल्याचं शिवसेनेनं अग्रलेखात म्हटलं आहे. “एकदा तरी सोनिया गांधी किंवा राहुल गांधींनी समोर येऊन यूपीएचं तुम्ही काय करणार? हे सांगायला हवं. यूपीए नसेल तर दुसरं काय? या चर्चेतच सध्या वेळ घालवला जात आहे. ज्यांना विरोधकांची भक्कम आघाडी हवी आहे, त्यांनी स्वत: पुढाकार घेऊन यूपीएच्या मजबुतीसाठी प्रयत्न करायला हवेत. काँग्रेसशी ज्यांचे मतभेद आहेत, ते ठेवूनही यूपीएची गाडी पुढे ढकलता येईल”, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

भाजपाविरोधी राष्ट्रीय आघाडीत काँग्रेस असेल का? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…!

“भाजपाला पर्यायाच्या बाता कुणी करू नयेत”

“ममता बॅनर्जी यांच्या मुंबई भेटीनंतर विरोधी पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. निदान शब्दांचे हवाबाण तरी सुटत आहेत. भारतीय जनता पक्षासमोर समर्थ पर्याय उभा करायला हवा यावर एकमत आहेच. पण कोणी कोणाला बरोबर घ्यायचे किंवा वगळायचे यावर विरोधकांत अखंड खल सुरू आहे. विरोधकांतच ऐक्याचा किमान समान कार्यक्रम तयार होणार नसेल तर भाजपास समर्थ पर्याय देण्याच्या बाता कोणी करू नयेत. आपापली राज्ये व पडक्या, मोडक्या गढय़ा सांभाळीत बसावे की एकत्र यावे यावर तरी किमान एकमत होणे गरजेचे आहे. त्या ऐक्याचे नेतृत्व कोणी करावे तो पुढचा प्रश्न”, असं देखील अग्रलेखातून शिवसेनेनं सुनावलं आहे.