Jharkhand hospital denies ambulance newborn body in box: सरकारी रुग्णालयाने रुग्णवाहिका देण्यास नकार दिल्यानंतर बाळाचा मृतदेह बॉक्समधून घेऊन जाण्याची वेळ बापावर आली. झारखंडमधील पश्चिम सिंघभूम जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. रुग्णालाने रुग्णवाहिका देण्यास नकार दिल्याचा आरोप मृत बाळाच्या वडिलांनी रविवारी माध्यमांशी बोलताना केला. 

नेमकं काय घडलं?

पीटीआय या वृत्तसंस्थेन प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, बांगरसई गावातील रामकृष्ण हेम्बरम यांनी गरोदर पत्नीला चक्रधरपूर उप-जिल्हारुग्णालयात गुरुवारी दाखल केले होते. शनिवारी राकृष्ण यांच्या पत्नीला बाळाला जन्म दिला. पण, बाळाच्या जन्म झाल्यानंतर काही वेळानंतर त्याचा मृत्यू झाला. 

वडिलांनी काय आरोप केलेत?

प्रसूती दरम्यान आणि त्यानंतर डॉक्टरांनी योग्य काळजी घेतली नाही त्यामुळे बाळाचा मृत्यू झाला, असा आरोप रामकृष्ण यांनी केला. मृतदेह घेऊन जाण्यासाठी रुग्णालय व्यवस्थापन दबाव टाकत होते. यासाठी आम्ही रुग्णवाहिकेची मागणी केली पण, त्यांनी रुग्णवाहिका देण्यास नकार दिला. यानंतर पुठ्यांचा बॉक्स घेऊन त्यात मृतदेह ठेवला आणि घरी घेऊन आलो, अशी माहिती रामकृष्ण यांनी माध्यमांना दिली.

रुग्णालयाकडून आरोपांचे खंडन

दरम्यान, रामकृष्ण यांनी केलेल्या आरोपाचे उप-जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी खंडन केले आहे. मृत बाळाच्या वडिलांनी तसेच त्यांच्या नातेवाईकांनी आमच्याकडे रुग्णवाहिकेची मागणी केली नाही. त्यांनी मागणी केली असती तर नक्कीच त्यांना रुग्णवाहीका दिली असती, असे डॉक्टर अनशुमन शर्मा म्हणाले.

घटनेचा तपास होणार

दुसरीकडे याप्रकरणाचा तपास सुरु केल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. याप्रकरणी दोषी आढळ्यास कडक कारवाई केली जाईल, असेही प्रशासनाने म्हटले आहे. पश्चिम सिंहभूम रुग्णालयातील सिव्हिल सर्जन हे पद गेल्या आठ दिवसांपासून रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे.