Hyderabad : हैदराबाद पोलिसांना एक लाल रंगाच्या बेवारस सुटकेस संदर्भात माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संबंधित बेवारस सुटकेसची तपासणी केली असता सर्वांनाच धक्का बसला. कारण या सुटकेसमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला. यानंतर या प्रकरणात पोलिसांनी तपासाची चक्र फिरवले आणि २४ तासांच्या आत या हत्या प्रकरणाचं गूढ उकललं.

या प्रकरणात हैदराबादमध्ये एका ३० वर्षीय नेपाळी नागरिकाला अटक करण्यात आली आहे. ४ जून रोजी हैदराबादमधील बाचुपल्ली येथील एका निवासी भागाजवळ एका ट्रॅव्हल बॅगमध्ये ३३ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी संशयित विजय टोप्पा उर्फ ​​विल्सन याला अटक केली आहे. हा एका स्थानिक रेस्टॉरंटमध्ये शेफ म्हणून काम करत होता. तसेच तो पीडितेसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

या घटनेच्या तपासात असं आढळून आलं आहे की, विजय आणि प्रेयसी तारा फेसबुकवर भेटले होते. त्यानंतर ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. तसेच विवाहित असूनही तारा दोन मुलांसह १५ एप्रिल रोजी हैदराबादला गेली आणि विजयबरोबर भाड्याच्या घरात राहू लागली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताराच्या गरोदरपणावरून २३ मे रोजी या जोडप्यात वाद झाला. रागाच्या भरात विजयने ताराचा नायलॉन बॅगच्या धाग्याने गळा दाबून खून केला असा आरोप आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच त्यानंतर त्याने तिचा मृतदेह एका मोठ्या ट्रॅव्हल बॅगमध्ये भरला आणि एका निर्जनस्थळी वसाहतीच्या जवळ नेऊन टाकला. त्यानंतर एका स्थानिक नागरिकाच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. फॉरेन्सिक पथकांसह घटनास्थळाची पोलिसांनी चौकशी करत तपास सुरु केला. तसेच आरोपीचा शोध घेण्यासाठी पाच विशेष पथके तयार करण्यात आली. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांचा वापर करून पोलिसांनी विजय याला अटक केली आणि त्यानंतर प्राथमिक चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याचं वृत्तात म्हटलं आहे.