Woman’s legs chopped off for silver anklets: राजस्थानमधून काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना उघडकीस आली आहे. चांदीचे पैंजण आणि इतर दागिने चोरण्यासाठी चोरट्यांनी ६० वर्षीय महिलेची निर्घृण हत्या केली. चोरट्यांनी वृद्ध महिलेचे दोन्ही पाय तोडले आणि गळा चिरुन हत्या केली. वृद्ध महिला शेळ्या चरण्यासाठी घेऊन गेली असता कोडाई गावात ही घटना घडली.

महिला घरी परतली नाही अन् शोध सुरु झाला

साठ वर्षीय कमला देवी शेळ्या चरण्यासाठी घेऊन गेली होती. यावेळी चोरट्यांनी महिलेवर हल्ला केला. तिच्या पायातील चांदीचे पैंजण आणि अंगावरील इतर दागिने चोरण्यासाठी चोरट्यांनी तिची हत्या केली. चोरट्यांनी अमानुषपणे महिलेचे दोन्ही पाय तोडले आणि गळा चिरुन दागिने घेऊन फरार झाले. शेळ्या घेऊन गेलेली महिला घरी माघारी परतली नाही अन् कुटुंबीयांनी महिलेचा शोध सुरु केला.

मुलाला जंगलात सापडला आईचा मृतदेह

आई घरी परतली नाही म्हणून कुटुंबीयांनी शोधाशोध सुरु केली. मुलगा आईच्या शोधात जंगलात पोहोचला. गावापासून दूर तीन किलोमीटर अंतरावर जंगलात त्याला आईचा मृतदेह आढळला. दोन्ही पाय तुटलेले आणि गळा चिरलेल्या अवस्थेतील मृतदेह त्याला जंगलात आढळून आला. महिलेच्या अंगावर लाखो रुपयांचे दागिने होते, अशी माहिती समोर आली आहे.

साडेसात लाख रुपये किंमतीचे दागिने चोरी

महिलेच्या अंगावर साडेसात लाख रुपये किंमतीचे दागिने होते, अशी माहिती कमला देवी यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांनी दिली आहे. यामध्ये पैंजण, कानातील झुमके, नाकातील रिंग यांचा समावेश होता. चोरट्यांनी दागिने घेऊन घटनास्थळावरुन पोबारा केला.

पोलिस तपास सुरु

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु करण्यात आला आहे. या घटनेतील चोरटे आणि हत्येतील संशयितांना अटक करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.