Shocking Crime News Madhya Pradesh : अल्पवयीन वधूने तिच्या २५ वर्षी पतीची निर्घृण हत्या केल्याचं धक्कादायक वृत्त मध्य प्रदेशमधून समोर आलं आहे. या अल्पवयीन मुलीने तिच्या प्रियकर आणि त्याच्या दोन मित्रांच्या मदतीने पतीच्या हत्येचा कट रचला. हत्या केल्यानंतर तिने तिच्या प्रियकराला व्हिडिओ कॉल करून काम तमाम झालं असल्याचंही कळवलं. पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या बुरहानपूर जिल्ह्यात १७ वर्षीय पत्नीने तिच्या २५ वर्षीय पतीची ३६ वेळा भोसकून हत्या केली. बुराहनपूरचे पोलीस उपनिरिक्षक देवेंद्र पाटीदार म्हणाले, १३ एप्रिल रोजी पोलिसांना इंदौर-इच्छापूर मार्गावरील एका झुडपात एक मृतदेह असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी चौकशी केली असता त्याचं नाव राहुल उर्फ गोल्डन असल्याचं समजलं. रामचंद्र पांडे कुणबी पाटील यांचा तो मुलगा आहे. ते शाहपूर येथे वास्तव्यास आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली. मृतदेहावर अनेक जखमाही होत्या.

काम तमाम झालंय

चौकशीदरम्यान असं आढळलं की घटना घडल्यापासून राहुलची पत्नी फरार आहे. तिचा प्रियकर युवराजबरोबर ती फरार असल्याचं पोलिसांना समजलं. जेव्हा युवराजला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं तेव्हा त्याने या घटनेची सविस्तर माहिती दिली. १२ एप्रिलच्या रात्री आठ ते साडेआठच्या दरम्यान, तिने युवराजला व्हिडिओ कॉल केला आणि राहुलचा रक्ताने माखलेला मृतदेह तिने युवराजला दाखवला. एवढंच नव्हे तर आपलं काम तमाम झाल्याचंही तिने तिच्या प्रियकराला कळवलं.

अधिक तपासानंतर या राहुलच्या अल्पवयीन पत्नीलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. तसंच, युवराजचा मित्र ललितला पोलिसांनी पकडलं. तिनेही या गुन्ह्याची कबुली दिली आहे. तसंच, त्याची हत्या कशी केली याचीही माहिती दिली.

असा रचला हत्येचा कट

अल्पवयीन पत्नीने सांगितलं, तिने खरेदी करायला जाण्याच्या बहाण्याने राहुलला बाहेर आणलं होतं. खरेदी करून झाल्यानंतर त्यांनी बाहेर थोडंफार खाललं. तिथून ते घरी परतत असताना युवराजचा मित्र ललित आणि आणखी एक अल्पवयीन साथीदार त्यांच्या मार्गावर होते. ठरल्यानुसार, तिने आपल्या पायातील चप्पल एका स्पीड ब्रेकरच्या येथे गाडीच्या बाहेर टाकली. त्यामुळे राहुलने चप्पल घेण्यासाठी गाडी थांबवली. त्याने गाडी थांबवताच तबा धरून बसलेल्या ललित आणि त्याच्या साथीदाराने राहुलला खेचत जवळच्या झुडुपामध्ये नेलं आणि तिथेच त्याच्यावर हल्ला केला. सुरुवातीला त्याच्या पत्नीने त्याच्यावर दारूच्या बाटल्या फोडल्या. त्यानंतर अल्पवयीन साथीदाराने त्याच्यावर हल्ला करत धारदार शस्त्राने वार केले. परिणामी त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटना घडल्यानंतर तिघेही रावेर रेल्वे स्थानकावर गेले. तिथून त्यांनी इतरसीला जाणारी ट्रेन पकडली. याप्रकरणी पोलिसांनी भरत उर्फ युवराज (२०), ललित (२०), राहुलची अल्पवयीन पत्नी आण त्यांना हत्येसाठी मदत करणाऱ्या अल्पवयीन साथीदाराला अटक केली आहे.