गुरुग्राम या ठिकाणी एका तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांच्या पद्धतीवर ताशेरे झाडले आहेत. पोलीस या प्रकरणात किती असंवेदनशील झाले आहेत असं म्हणत खालच्या कोर्टातील मॅजेस्ट्रीट्सनाही खडे बोल सुनावण्यात आले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी काय म्हटलं आहे?

१) निष्पाप चिमुरड्या मुलीला आरोपी कुठे होता, काय करत होता हे वारंवार विचारण्यात आलं.

२) इतक्या लहान मुलीच्या बाबतीत पोलीस असे वागले जी संवेदनहीनता दाखवली ती चिंताजनक आहे.

३) तीन वर्षांच्या मुलीला हे सांगण्यात आलं की तू काय घडलं ते खरंब बोल. मॅजस्ट्रिटने अशा पद्धतीने एका तीन वर्षांच्या मुलीला सांगणं योग्य आहे का?

४) आरोपीच्या समोर या मुलीला हे प्रश्न मॅजिस्ट्रेटने विचारले.ही बाब आश्चर्य निर्माण करणारी आणि तेवढीच चिंताजनक आहे.

अशा चार गोष्टींवर भाष्य करत सर्वोच्च न्यायालयाने मॅजिस्ट्रेट आणि पोलिसांना खडे बोल सुनावले आहेत. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या तीन न्यायाधीशांच्या पीठाने या प्रकरणाच्या सुनावणीच्या दरम्यान गंभीर प्रश्न उपस्थित केले. एखाद्या चिमुरडीला अशी कशी काय वागणूक देता? असा प्रश्न सरन्यायाधीशांनी विचारला. Live Law ने हे वृत्त दिलं आहे.

पीडित मुलीला आरोपीच्या समोर का आणलं?

सर्वोच्च न्यायालयाने पुढे असंही म्हटलं आहे की पॉक्सोच्या प्रकरणात आरोपीच्या समोर पीडित मुलीला आणलं जात नाही. त्याच्या जवळही नेलं जात नाही तरीही तुम्ही आरोपीच्या समोर त्या मुलीला प्रश्न विचारत होतात. पोलीस काय करत होते? त्यांनी या प्रकरणात FIR का दाखल केला नाही? तक्रार दाखल झाली नसेल तरीही पोलिसांनी FIR दाखल करुन घ्यायला हवा होता. पोलीस अशा प्रकरणांमध्ये किती असंवेदनशील झाले आहेत हेच दिसतं आहे असं कोर्टाने म्हटलं आहे.