संयुक्त राष्ट्रसंघात केलेल्या भाषणात अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी नवा सूर आळविल्यामुळे इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव दूर होण्यास मदत होईल, असा आशावाद इराणचे नवे अध्यक्ष हसन रौहानी यांनी व्यक्त केला आहे. अलीकडेच झालेल्या निवडणुकीनंतर आपल्याकडे इराणचे अध्यक्षपद आले, त्यामुळे नवे वातावरण तयार झाले असल्याने पाश्चिमात्य देशांशी उत्तम संबंध ठेवण्यासाठी त्याचा लाभ होईल, असेही रौहानी यांनी म्हटले आहे. ओबामा यांची भेट अद्याप आपण घेतलेली नाही. तथापि, अमेरिका आणि त्यांचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील मित्र यांच्याशी झालेल्या चर्चेतून चित्र आशादायी असल्याचे स्पष्ट झाले आहे, असेही ते म्हणाले.