आसाम- अरुणाचल सीमेवर धेमाजी जिल्ह्यातील गोगामुख येथे रस्त्याच्या एका वादग्रस्त भागात अरुणाचल राज्य सरकारच्या एका कंत्राटदाराने सुरू केलेल्या रस्त्याच्या बांधकामाला स्थानिक रहिवाशांनी आक्षेप घेतल्यानंतर या ठिकाणी तणाव निर्माण होऊन त्यातून हिंसाचार घडला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ही घटना आसाममधील गोगामुख पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिमे बस्ती येथे बुधवारी सायंकाळी घडली. अरुणाचल सरकारने या ठिकाणी रस्त्याचे बांधकाम करण्यावर आसाममधील स्थानिक गावकऱ्यांनी हरकत घेतली. निषेध नोंदवण्यासाठी हे गावकरी बांधकामाच्या जागी गेले असता संबंधित कंत्राटदाराने हवेत गोळीबाराची एक फैर झाडली, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.
पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत अरुणाचल प्रदेश सरकार जिल्ह्यात स्थानिक कंत्राटदाराची सेवा वापरून लिकाबाली ते दुरपाडी दरम्यान ७० किलोमीटर लांबीचा रस्ता बांधत आहे. आसाममधील संतप्त लोकांनी हे काम थांबवले, काही वाहनांचे नुकसान केले आणि रस्ते बांधकाम मजुरांसाठी बांधलेल्या एका तात्पुरत्या शिबिराला आग लावून दिली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर आसाम पोलिसांचे एक पथक त्या ठिकाणी पोहचले. यानंतर कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून
आम्ही या भागात बंदोबस्त तैनात केला आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले. ‘हा मुद्दा जुनाच असून, बुधवारी सायंकाळची घटना ही हितसंबंध असलेल्या काही मोजक्या स्थानिक रहिवाशांमध्ये घडली’, असे अरुणाचलच्या लोअर सियांग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुशल पाल सिंह म्हणाले.