पुरेसे संख्याबळ नसेल तर मी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवू नको का? असा खोचक प्रश्न राष्ट्रपतीपदाच्या यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांनी पत्रकारांना विचारला आहे. बंगळुरूमध्ये झालेल्या कार्यक्रमात मीरा कुमार यांनी हजेरी लावली होती त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना, रामनाथ कोविंद यांचे संख्याबळ तुमच्या तुलनेत जास्त आहे त्यामुळे ते निवडून येण्याची शक्यता जास्त आहे यावर तुमचे काय म्हणणे आहे? असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला. मी जिथे जाईन तिथे मला हाच एक प्रश्न विचारला जातो आहे. मीडियाने जर रामनाथ कोविंदच विजयी होतील असे गृहीत धरले असेल तर मी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवू नको का? असा तिखट प्रश्न विचारत, मीरा कुमार यांनी पत्रकारांना झापले आहे.

एनडीएने रामनाथ कोविंद यांचे नाव राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले. दलित उमेदवार जाणीवपूर्वक भाजपने दिला असल्याची टीका करत त्यांच्या तोडीस तोड उमेदवार म्हणून यूपीएने मीरा कुमार यांना उमेदवारी दिली. सध्या मीरा कुमार यांच्या पाठिशी काँग्रेससह १७ पक्षांचे बळ आहे. आप अर्थात आम आदमी पार्टीनेही मीरा कुमार यांनाच पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रपतीपदाची निवडणूक चुरशीची होणार आहे यात शंका नाही.

एनडीएकडे संख्याबळ जास्त असल्याने रामनाथ कोविंद हेच राष्ट्रपती होण्याची शक्यता जास्त असल्याचे म्हटले जाते आहे. मात्र मीरा कुमार याही त्यांना टक्कर देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. मीरा कुमार यांच्या उमेदवारीवर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी रोष व्यक्त करत तुम्ही हरवण्यासाठीच मीरा कुमार यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली असे म्हटले होते. त्यामुळे जदयू आणि काँग्रेस यांच्यातला वाद चव्हाट्यावर आला. अशात आता, संख्याबळ नसेल तर निवडणूक लढवूच नको का? असा प्रश्न विचारत मीरा कुमार यांनी शाब्दीक बॉम्ब टाकला आहे. त्यामुळे त्याही निवडणुकीसाठी कसून तयारीला लागल्या आहेत हेच त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होताना दिसते आहे.

राष्ट्रपतीपदाची निवडूक १७ जुलै रोजी होणार आहे. या निवडणुकीत रामनाथ कोविंद हे एनडीएकडून तर मीरा कुमार यूपीएकडून उभ्या आहेत. सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर २० जुलैला मतमोजणी होणार आहे. खासदार आणि आमदार यांना १७ जुलैला मतदान करून नवा राष्ट्रपती निवडता येणार आहे. विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ २५ जुलै रोजी संपणार आहे.