देशातील बहुचर्चित श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणातील आरोपी आफताब पूनावाला याला पोलिसांनी सोमवारी साकेत न्यायालयासमोर हजर केलं. पोलिसांनी आफताबविरोधात चार्जशीट दाखल केली आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी ६,६२९ पानांचं आरोप पत्र दाखल केलं आहे. तसेच पोलिसांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आफताबला न्यायालयासमोर हजर केलं होतं. दरम्यान, आता अशी माहिती मिळाली आहे की, आफताबने त्याची पार्टनर श्रद्धाच्या मृतदेहाच्या तुकड्यांची हिमाचल प्रदेशमध्ये नेऊन विल्हेवाट लावणार होता. तिथे तो याआधी श्रद्धासोबत सुट्टीत फिरायला गेला होता.
पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटनुसार आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे हिमाचल प्रदेशमध्ये नेण्यासाठी एक काळ्या रंगाची बॅग खरेदी केली होती. तसेच त्याने काही टॅक्सीचालकांशी हिमाचलला जाण्यासंदर्भात संपर्क केला होता. परंतु आपण पकडले जाऊ या भीतीने त्याने ही योजना रद्द केली.
हिमाचलला जाण्याची योजना रद्द केल्यानंतर आफताबने त्याच्या मित्राच्या घराच्या आसपासचा परिसर निवडला. येथे तो नेहमी सिगारेट ओढण्यासाठी जात होता. परंतु त्यानंतर त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे जंगलात फेकण्याचा निर्णय घेतला.
हे ही वाचा >> Republic Day: पहिल्यांदाच नऊ राफेल विमानांची प्रात्यक्षिकं, जाणून घ्या आणखी खास काय काय घडलं?
आफताबला पोलिसांची दिशाभूल करायची होती
श्रद्धाच्या हत्येनंतर आरोपीने १० ते १२ दिवस तिचा फोन वापरला. जेणेकरून भविष्यात जर तपास केला गेला तर तो वाचेल आणि पोलिसांची दिशाभूल होईल. पोलिसांच्या तपासात असं आढळलं की, श्रद्धाच्या फोनवर अनेक कॉल यायचे. आफताब हे कॉल उचलायचा, परंतु त्यावर काही बोलत नव्हता. तसेच तो श्रद्धाच्या मित्रांना कॉल करायचा. कॉल रिसीव्ह केल्यानंतर तो फोन बाजूला ठेवून द्यायचा. तसेच त्याने मृतदेहाच्या हात-पायांची नखं जाळून टाकली.