देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आफताब पूनावाला हा सायको आणि सोशियोपॅथिक प्रवृत्तींचा आहे अशी माहिती त्याच्या चाचणीतून समोर आली आहे. श्रद्धा वालकरच्या हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला होता. आता आफताबाबत ही नवी माहिती समोर आली आहे.

आफताब आक्रमक प्रवृत्तीचा आणि सायको असल्याचं समोर

आफताब पूनावाला हा आक्रमक आणि सायको प्रवृत्तीचा असल्याचं समोर आलं आहे. आफताबची आयसेन्क चाचणी, अग्रेसिव्ह टेन्डन्सी टेस्ट, पिक्चर फ्रर्स्टेशन टेस्ट, इमोशनल मॅच्युरिटी टेस्ट या चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांच्या अहवालानुसार आफताब सायको असल्याचं समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एनडीटीव्हीने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. सूत्रांनी असंही सांगितलं आहे की आफताबने गुन्ह्याबाबत कुठलाही पश्चात्ताप व्यक्त केलेला नाही. तसंच या चाचणी दरम्यान असंही आढळून आलं आहे की आफताब स्वतःचा बचाव करु पाहतो आहे. त्याला कायदेशीर कारवाईत अडकायचं नाही यासंबंधीचा विचार तो करतो आहे.

श्रद्धा वालकर हत्या प्रकरण काय?

२७ वर्षीय कॉल सेंटर कर्मचारी श्रद्धा वालकर हिची तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताब पूनावाला याने मे २०२२ मध्ये दिल्लीतील मेहरौली येथील फ्लॅटमध्ये गळा दाबून हत्या केली होती. त्यानंतर त्याने तिच्या शरीराचे अनेक तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवले आणि दिल्लीच्या विविध भागांतील जंगलात विल्हेवाट लावली. या धक्कादायक गुन्ह्यानंतर १२ नोव्हेंबर २०२२ रोजी त्याला अटक करण्यात आली होती. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी आफताब पुनावाला यानं कोर्टासमोर हत्येची कबुली दिली आहे. रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केल्याचं आफताबनं कोर्टासमोर सांगितलं.

आफताब पूनावालाबाबत काय माहिती समोर

आफताब पूनावालाने श्रद्धा वालकर या त्याच्या गर्लफ्रेंडची आणि लिव्ह इन पार्टनरची १८ मे २०२२ ला गळा दाबून हत्या केली.

श्रद्धाची हत्या लपवण्यासाठी आफताब पूनावालाने श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले.

श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताब जूनपर्यंत तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट वापरत होता जेणेकरून लोकांना हे भासवत होता की ती जिवंत आहे.

आफताब पूनावालाने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे १८ दिवसांहून अधिक काळ फ्रीजमध्ये ठेवले आणि एकेक तुकडा तो जंगलात फेकत राहिला.

इंडियन एक्स्प्रेसच्या एका बातमीनुसार आफताबने श्रद्धाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले होते तेव्हा त्याने दुसऱ्या मुलींना घरी डेटिंगसाठी बोलावलं होतं.

श्रद्धा आणि आफताब एका डेटिंग अपच्या माध्यमातून एकमेकांना भेटले होते.

2019 मध्ये श्रद्धाने तिच्या आईला आफताब बद्दल सांगितलं आणि त्याच्याबरोबर राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र धर्म वेगळा असल्याने आईने या प्रस्तावाला नकार दिला होता.

श्रद्धा नाराज होऊन घर सोडून गेली आणि आफताबसोबत राहू लागली होती. त्यानंतर काही दिवसांनी तिने तिच्या आईला सांगितलं होतं की आफताब तिला मारहाण करतो.

लग्नाच्या मुद्द्यावरून त्या दोघांमध्ये नेहमी भांडणं व्हायची. 18 मे ला रागाच्या भरात त्याने श्रद्धाची हत्या केली. तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि ते ठेवण्यासाठी एक फ्रीज खरेदी केला होता.