Shraddha Walker murder case 17 pieces of Shraddha body charge sheet against Aftab Poonawala ysh 95 | Loksatta

श्रद्धा वालकर हत्या प्रकरण : श्रद्धाच्या मृतदेहाचे १७ तुकडे, आफताब पूनावालावरील आरोपपत्र

देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी न्यायालयात आफताब अमिन पूनावालाविरोधात आरोपपत्र दाखल केले.

shraddha aftab
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

एक्सप्रेस वृत्त, नवी दिल्ली : देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी न्यायालयात आफताब अमिन पूनावालाविरोधात आरोपपत्र दाखल केले. यात १८ मे रोजी श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे १७ तुकडे केले आणि ते फ्रीज तसेच कपाटात लपवून ठेवल्याचे म्हटले आहे. आफताबचे वकील एम. एस. खान यांनी खटल्यावेळी आपले म्हणणे मांडले जाईल, असे सांगितले. 

आफताबने पोलिसांना दिलेल्या कबुलीजबाबावर आधारित असलेले ६,६२९ पानी आरोपपत्र दिल्लीतील न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. यातील तपशील समोर आला असून श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये असतानाच आफताब डेटिंग अ‍ॅपवरून इतर स्त्रियांशी संबंध ठेवून असल्याचे म्हटले आहे. त्यातील एकीला तो घरी घेऊन यायचा आणि त्यावेळी मृतदेहाचे तुकडे फ्रिजमधून बाहेर काढून इतरत्र लपवून ठेवायचा, असा दावा आरोपपत्रात करण्यात आला आहे. आफताबबरोबर लिव्ह-इनमध्ये राहत असताना श्रद्धाला जिवाची भीती वाटत असल्याचे यात नमूद केले आहे.

श्रद्धासोबत राहात असतानाही आफताब ‘बम्बल’ या डेटिंग अ‍ॅपवरून इतर स्त्रियांशी संपर्क साधत होता. याच अ‍ॅपवर त्या दोघांचीही भेट झाली होती. इतर स्त्रियांच्या संपर्कात असल्याचे श्रद्धाच्या लक्षात आल्यावरून दोघांमध्ये वाद झाले होते. त्यानंतर १८ मे २०२२ रोजी आफताबने श्रद्धाची गळा दाबून हत्या केली, त्यानंतर तिच्या मृतदेहाचे १७ तुकडे केले आणि जवळपास तीन आठवडे ते फ्रिजमध्ये लपवून ठेवले. त्यानंतर पुढील काही दिवसांमध्ये त्याने दिल्लीमध्ये वेगवेगळय़ा ठिकाणी मृतदेहाच्या तुकडय़ांची विल्हेवाट लावल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. हत्येनंतर आफताबने हत्यारे, पाण्याच्या बाटल्या, कोरडा बर्फ, नवीन फ्रिज या खरेदीच्या तपशीलाचाही आरोपपत्रामध्ये समावेश आहे.

 दिशाभूल करण्याचा प्रयत्न

आधी चौकशीदरम्यान आफताबने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. आपण श्रद्धाचा मृतदेह जाळून राखेची विल्हेवाट लावली आणि तिच्या हाडांची भुकटी करून ती फेकून दिली, असे त्याने पोलिसांना सांगितले होते. मात्र त्यानंतर त्याने मृतदेहाचे तुकडे केल्याचे कबूल केले, असा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 00:41 IST
Next Story
भूकंपबळी सहा हजारांवर; बचावकार्य तोकडे