आमदार लक्ष्मण जगताप आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्या वादावर अखेर पडदा

आमच्यातला वाद मिटला आहे असे या दोघांनी जाहीर केले

पिंपरी चिंचवडमधले भाजपा आमदार आणि शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप आणि शिवसेनेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या वादावर अखेर पडदा पडला आहे. गेल्या काही वर्षांपासून या दोघांमधला वाद सर्वश्रुत होता. मात्र वादावर पडदा टाकत युतीच्या दिशेने पाऊल टाकत या दोघांनी आपसातले वाद मिटवले. यासंदर्भात दोघांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन एकमेकांमधील गैरसमज दूर केले. दोघांनी गळाभेट घेत एकमेकांना पेढे भरवले आणि कटूततेचे रूपांतर गोडात केले.यावेळी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे,राज्यसभा खासदार अमर साबळे,भाजपा आमदार लक्ष्मण जगताप,आमदार गौतम चाबुकस्वार आदी नेते उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच मावळ लोकसभा मतदार संघाचे उमेदवारी कोणाला मिळणार यावर सर्वांचे लक्ष होते. मात्र,श्रीरंग बारणे हे विद्यमान खासदार असल्याने आणि भाजपा सेना युती झाल्याने तेथील जागा शिवसेनेला मिळाली. परंतु, त्यानंतर आमदार लक्ष्मण जगताप यांचा मावळ लोकसभेसाठी पक्षाने विचार करावा अशा आशयाचे पत्र वरिष्ठ नेत्याला कार्यकर्त्यानी दिले होते. चिंचवडमध्ये झालेल्या युतीच्या बैठकीला देखील आमदार लक्षण जगताप हे अनुपस्थित राहिले होते. त्यामुळे त्यांच्यातील वाद हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत होता.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा आमदार लक्षण जगताप यांचा खासदार श्रीरंग बारणे यांनी पराभव केला होता. यावेळी मात्र ते श्रीरंग बारणे यांना पाठिंबा देणार का यावर मतमतांतर होते. मात्र, त्यांनी आज त्याचे वाद मिटवून घेत मनोमिलन केले. आमच्यात गेल्या १० वर्षांपासून वाद होते परंतु ते वैयक्तिक नसून विकासाच्या दृष्टीने होते अस लक्ष्मण जगताप म्हणाले. तर केलेलं आरोप मागे घेत असल्याचे बारणे म्हणाले.जगताप यांच्या मनोमिळणाने बारणे यांना नक्कीच फायदा होईल असं बोललं जातं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shreerang barne and laxman jagtap dispute finally ends