श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा न्यासाचे दिनेश मिश्रा ऊर्फ फलहारी बाबा (दिनेश फलहारी महाराज) यांच्या विरोधात फसवणूक, तसेच खंडणी मागणे व संस्थेचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करणे या बाबींसाठी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्याचे वृत्त इंडिया टुडे या वृत्तसंस्थेने दिले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फलहारी बाबांनी एक पत्र लिहिले. या पत्रात ‘श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा न्यासा’ने देणग्यांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला असून जन्मस्थान सेवा न्यासाची याप्रकरणात सीबीआयकडून चौकशी करण्यात यावी असे नमूद केले आहे. हे पत्र पाठवताच, दुसऱ्या दिवशी फलहारी बाबांविरूद्ध तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली असून तपासाअंती आरोपीवर एफआयआर दाखल करण्यात येईल असे सांगितले आहे. या आरोपांविरूद्ध स्वत: फलहारींनी मात्र अद्याप कोणतेच स्पष्टीकरण दिलेले नाही. फलहारी बाबांविरूद्ध अनुराग पाठक यांनी गोविंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
खोट्या नावाने दुसरी संस्था सुरू केली
अनुराग पाठक हे श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा न्यासाचे सहाय्यक व्यवस्थापक आहेत. पाठक यांनी जो आरोप केला त्यानुसार शर्मा अनेक गुन्हेगारीच्या प्रकरणात सामील असून त्यांची पार्श्वभूमीदेखील चांगली नाही. पाठक यांनी असाही दावा केला की, फलहारी बाबांनी ‘श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा न्यासा’प्रमाणेच त्यांची स्वतःची एक नवीन संस्था उघडली आहे. या संस्थेचे नाव ‘श्रीकृष्ण जन्मभूमि संघर्ष न्यास’ असे आहे. हे नाव मिळतेजुळते असल्यामुळे लोक देणगी देताना मूळ न्यासाऐवजी चुकून या संस्थेला देणगी देतात. फलहारी बाबांनी हे जाणून-बुजून केले असल्याचे पाठक म्हणाले. पाठक यांनी केलेल्या तक्रारीनुसार, शर्मा यांनी स्वार्थासाठी असे केले असून ते संस्थेला मिळणाऱ्या देणग्यांचा गैरवापर करत आहेत. लोकांनी जेव्हा त्यांच्या या कृतीचा विरोध केला, तेव्हा फलहारी बाबांना असे वाटले की, हा विरोध सेवा न्यासानेच घडवून आणला आहे, म्हणूनच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांमार्फत धमक्या दिल्या आहेत. फलहारी बाबांच्या सहकाऱ्यांनी न्यासाकडे वीस लाख रुपयांची खंडणी मागितली आहे.
खंडणी न दिल्यास समाजात बदनामी करू !
पैसे न दिल्यास ते समाजात संस्थानाची बदनामी करतील, तसेच पोलिसांकडे खोटी तक्रार दाखल करतील; अशी धमकीही त्यांनी न्यासाला दिली आहे. “आम्ही त्यांनी केलेल्या या मागण्या फेटाळून लावल्याबरोबर त्यांनी आमच्याविरूद्ध खोट्या तक्रारी दाखल केल्या आणि आमच्याकडून पैसे मिळवण्यासाठी आमच्यावर दबाव निर्माण केला आहे”, असेही पाठक यांनी सांगितले.
विजय बहादूर सिंह हे न्यासाचे जनसंपर्क अधिकारी आहेत. ते म्हणाले, “पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत, त्यामुळे आम्ही त्यांच्या तपासात काय समोर येते त्याची प्रतिक्षा करत आहोत.” संस्थेने फलहारी बाबांवर फसवणूक आणि खंडणीचा आरोप केला आहे, तर दुसरीकडे फलहारी बाबांनी यापूर्वीच संस्थेकडून देणग्यांच्या व्यवस्थापनाबाबत सीबीआयच्या चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलीस पुढे कोणती पाऊले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
