राजधानी दिल्लीतील एका प्रसिद्ध IAS कोचिंग इन्स्टिट्यूटच्या संचालिकेला भोपाळमध्ये बळजबरीने डांबून ठेवून त्यांच्याकडून १.८९ कोटी रुपयांची खंडणी उकळल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. भोपाळ गुन्हे शाखेने (क्राईम ब्रांच) या प्रकरणाचा छडा लावत मास्टरमाइंडसह सहा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या कटाचा मुख्य सूत्रधार पीडित महिलेचा माजी विद्यार्थीच असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

नेमकी घटना काय?

दिल्लीतील प्रसिद्ध शिक्षिका आणि ‘शुभ्रा रंजन IAS अकॅडमी’च्या संचालिका शुभ्रा रंजन यांना प्रियंक शर्मा नावाच्या तरुणाने भोपाळमध्ये सेमिनार आणि नवीन कोचिंग सेंटरच्या विस्ताराचे आमिष दाखवून बोलावले होते. त्या भोपाळमध्ये पोहोचल्यावर त्यांना भदभदा येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये उतरवण्यात आले. तेथून त्यांना बागसेवनिया भागातील एका भाड्याच्या सदनिकेत नेण्यात आले.

तिथे आरोपींनी त्यांना पिस्तुल आणि गावठी कट्ट्याचा धाक दाखवून दोन दिवस बळजबरीने डांबून ठेवले. या काळात शुभ्रा रंजन यांना धमकावून ‘जनकशिला’ आणि ‘आरएस एंटरप्रायजेस’शी संबंधित बँक खात्यांमध्ये १.८९ कोटी रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करण्यास भाग पाडले.

पोलिसांची तत्पर कारवाई

घटनेची माहिती मिळताच भोपाळ पोलिसांनी चक्र फिरवली. गुन्हे शाखेने तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या काही तासांत आरोपींनी ज्या खात्यात पैसे वळवले होते, ती खाती गोठवली आहेत. यामुळे १.८९ कोटींची पूर्ण रक्कम सुरक्षित असून ती पीडित महिलेला परत मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे.

आरोपींचे ‘क्राइम मास्टर’ नियोजन

तपासात समोर आलेले मुद्दे थक्क करणारे आहेत. पीडित महिलेला घाबरवण्यासाठी आरोपींनी आपल्याच एका साथीदाराच्या अपहरणाचा बनावट व्हिडिओ तयार केला होता. गुन्हेगारांनी भाड्याच्या खोलीत आरडाओरडा बाहेर जाऊ नये म्हणून तिथे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कृत्यासाठी दतिया आणि रेवा येथून सशस्त्र गुन्हेगारांना बोलावण्यात आले होते. अटक टाळण्यासाठी मुख्य आरोपी प्रियंक शर्मा याने आजारी असल्याचे नाटक करून एम्स (AIIMS) भोपाळच्या आयसीयूमध्ये भरती होण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला तिथूनच ताब्यात घेतले.

माजी विद्यार्थीच निघाला गुन्हेगार

मुख्य आरोपी प्रियंक शर्मा हा यापूर्वी शुभ्रा रंजन यांचा विद्यार्थी राहिला आहे. त्याला अकॅडमीच्या आर्थिक व्यवहारांची माहिती होती. हा गुन्हा केल्यानंतर तो परदेशात पळून जाण्याच्या तयारीत होता. या संपूर्ण कटात त्याच्या पत्नीचाही सहभाग असल्याचा संशय असून पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत.

सध्या सहाही आरोपी पोलीस कोठडीत असून, भोपाळ पोलीस त्यांच्या इतर साथीदारांचा आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीचा शोध घेत आहेत. या कारवाईमुळे मोठ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश झाला आहे.