मुलांच्या मनातून भीती घालवण्यासाठी कुटुंब न्यायालयातील वकिलांनी आणि न्यायाधीशांनी काळे कोट परिधान करु नयेत. लहान मुलांच्या मनात या रंगाची भीती बसणार नाही. हा सल्ला भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी दिला आहे. तसंच कुटुंब न्यायालयाचं नाव बदलून ते कुटुंब समस्या समाधान केंद्र असं ठेवलं जावं असाही सल्ला त्यांनी दिला आहे.दिल्ली येथील रोहिणी भागात फॅमिली कोर्टाची आधारशिला ठेवण्याचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी त्यांनी हा सल्ला दिला. फॅमिली कोर्टामध्ये काळे गणवेश हवेत का? मला तर वाटतं की नाही. कारण यामुळे लहान मुलांच्या मनात भीती निर्माण होऊ शकते.

CJI सूर्यकांत यांनी काय म्हटलं आहे?

चीफ जस्टिस सूर्यकांत यांनीही हा प्रस्ताव दिला आहे की कुटुंब न्यायालयात न्यायाधीश आणि वकिलांनी काळे कपडे घालू नयेत. कारण यामुळे लहान मुलांच्या मनात भीती निर्माण होते. फॅमिली कोर्ट फक्त निर्णय देणाऱ्या संस्था नाहीत. मानवी मूल्यं, परस्परांमधली नाती यामध्ये सुधारणा आणण्यासाठी उपलब्ध होणारा हा मंच आहे. Live Law ने हे वृत्त दिलं आहे. कुटुंब समस्या समाधान केंद्र असं नाव जर आपण दिलं तर ते देखील जास्त योग्य ठरेल असंही सूर्यकांत यांनी म्हटलं आहे. आपण याला कोर्ट म्हणण्यापेक्षा असं नाव देणं जास्त समर्पक ठरेल असंही त्यांनी म्हटलं आहे.

विविध न्यायाधीशांनी मांडली त्यांची मतं

दिल्लीतल्या रोहिणी मध्ये जो कार्यक्रम पार पडला त्यात विविध न्यायाधीशांनी त्यांची मतं व्यक्त केली. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय म्हणाले कुटुंबात निर्माण होणारे वाद जर तातडीने सोडवायचे असतील तर त्याप्रकारची यंत्रणा आणली हवी. दीर्घ काळापासून प्रलंबित असलेली प्रकरणं सुटण्यास मदत होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मनमोहन म्हणाले पायाभुत धोरणांमध्ये काही कमतरता आहेत त्या आपल्याला दूर कराव्या लागतील. तर दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश संजीव नरुला म्हणाले की कामाचे वाढलेले तास, जनतेच्या नजरेत राहण्यासाठी न्यायाधीशांवर असलेलं ओझं यामुळे न्यायाधीशांवरचा दबाव वाढतो. याकडे लक्ष देऊन जाणीवपूर्वक बदल केले पाहिजेत.