कर्नाटकच्या राजकारणात मागील काही महिन्यांत मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. सिद्धरामय्या यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर डी.के.शिवकुमार यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र, काँग्रेसने कर्नाटकात केलेल्या नेतृत्व बदलावरून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. २०२८ च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात नेतृत्व बदल करण्यात आल्याचं बोललं जातं.
कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर सिद्धरामय्या नाराज असल्याची चर्चा होती. त्यानंतर आता सिद्धरामय्या यांनी एक मोठी घोषणा केली आहे. ‘राजकारण खूप भ्रष्ट झालं आहे’, असं म्हणत आपण २०२८ ची विधानसभेची निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा सिद्धरामय्या यांनी केली. सिद्धरामय्या यांच्या या घोषणेमुळे काँग्रेसच्या गोटात आणि कर्नाटकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिलं आहे.
सिद्धरामय्या यांनी काय घोषणा केली?
“मी २०२८ ची विधानसभा निवडणूक लढवणार नाही. माझं वय आता ७९ वर्षे आहे. आमच्या सरकारचा कार्यकाळ संपायला अजून दीड वर्ष बाकी आहेत. तोपर्यंत माझं वय ८१-८२ वर्षे होईल. माझी प्रकृती पूर्वीसारखी ठणठणीत राहिलेली नाही. त्यामुळे आता पूर्वीसारख्या उत्साहाने काम करणं शक्य होत नाही”, असं सिद्धरामय्या यांनी पोस्ट शेअर करत म्हटलं आहे.
‘राजकारण भ्रष्ट झालंय…’
“२०२८ ची विधानसभा निवडणूक किंवा भविष्यातील कोणतीही निवडणूक लढवणार नाही. मात्र, आपण सार्वजनिक जीवनात सक्रिय राहू आणि जनतेसाठी आवाज उठवणं सुरू ठेवू. आजचं राजकारण पूर्णपणे भ्रष्ट झालेलं आहे. त्यामुळे मी निवडणूक न लढवण्याचं ठरवलं आहे. पण राजकारणात सक्रिय राहून लोकांच्या सुख-दुःखांचा आवाज बनून त्यांच्या पाठीशी उभा राहीन”, असं सिद्धरामय्या यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, निवडणुकीतील आपल्या जुन्या प्रचार मोहिमांची आठवण सांगताना सिद्धरामय्या यांनी सांगितलं की, जेव्हा त्यांनी याआधी निवडणुका लढवल्या होत्या, तेव्हा मतदारसंघातील अनेक लोकांनी त्यांना आर्थिक मदत करत आपला विजय सुनिश्चित केला होता. पण आता परिस्थिती बदलली आहे. आजचं राजकारण पूर्णपणे भ्रष्ट झालं आहे. प्रामाणिक राजकारणाला आज काहीच स्थान उरलेलं नाही. त्यामुळे मी आता भविष्यात निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला आहे”, असंही सिद्धरामय्या म्हणाले आहेत. दरम्यान, सिद्धरामय्या यांच्या निवडणूक न लढवण्याच्या घोषणेवर काँग्रेस हायकमांडच्या काय प्रतिक्रिया येतात? ते पाहणंही महत्वाचं ठरणार आहे.
