गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी सुरू होत्या. मुख्यमंत्री पदावरून काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचंही बोललं जात होतं. या घडामोडीनंतर अखेर आज कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला असून आता डी.के.शिवकुमार यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदी वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे.

सिद्धरामय्या यांनी गुरुवारी (२८ मे) सकाळी एक महत्त्वपूर्ण ‘ब्रेकफास्ट मीटिंग’ आयोजित केली होती. त्या मीटिंगमध्येच सिद्धरामय्या यांनी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसमोर राजीनामा देण्याची घोषणा केली होती. यावेळी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार हे देखील उपस्थित होते. या घोषणेनुसार, आज दुपारी सिद्धरामय्या यांनी लोकभवनमध्ये दाखल होत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.

कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत हे लोकभवनमध्ये उपस्थित नसल्यामुळे सिद्धरामय्या यांनी राज्यपालांचे सचिव प्रभू शंकर यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे. राजीनामा दिल्यानंतर सिद्धरामय्या यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर भाष्य केलं. ‘मी माझा शब्द पाळला आहे’, असं सांगत आपण राष्ट्रीय राजकारणात जाण्यास इच्छुक नसल्याचंही सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे काँग्रेसची राज्यसभेची ऑफर सिद्धरामय्या यांनी नाकारली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

सिद्धरामय्या काय म्हणाले?

“काँग्रेस पक्षाच्या हायकमांडने मला राजीनामा देण्यास सांगितलं, त्यानुसार मी आज माझा राजीनामा सादर केला आहे. मला खात्री आहे की जेव्हा राज्यपाल लोकभवनमध्ये येतील, तेव्हा ते राजीनामा स्वीकारतील. कारण संविधानानुसार हे करणं आवश्यक आहे. आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना (सरकार स्थापन करण्याची) परवानगी देणं घटनात्मक आहे. तसेच मला मुख्यमंत्री पदाची संधी दिल्याबद्दल सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांचं मी मनःपूर्वक आभार मानतो”, असं सिद्धरामय्या यांनी म्हटलं आहे.

“आम्ही जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी करण्यासाठी काम केलं आहे. २०१३ मध्ये आम्ही १६३ आश्वासनं दिली होती. त्यापैकी आम्ही १५८ आश्वासनं पूर्ण केले आहेत. २०२३ मध्ये आम्ही ५५० पेक्षा जास्त आश्वासनं दिली होती. त्यापैकी आम्ही जवळपास ३०० आश्वासनं पूर्ण केली आहेत. याशिवाय आम्ही ५ हमी योजना जाहीर केल्या आहेत, ज्या आम्ही पहिल्याच वर्षात पूर्ण केल्या आहेत”, असंही सिद्धरामय्या यांनी यावेळी स्पष्ट केलं.

काँग्रेसची राज्यसभेची ऑफर नाकारली?

सिद्धरामय्या यांनी आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच सिद्धरामय्या यांनी काँग्रेस हायकमांडच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. दरम्यान राजीनामा दिल्यानंतर सिद्धरामय्या राज्यसभेवर जाणार असल्याच्या चर्चा होत्या. तसेच काँग्रेस हायकमांडनेही सिद्धरामय्या यांना राज्यसभेची ऑफर दिल्याची माहिती समोर आली होती. मात्र, काँग्रेसची राज्यसभेची ऑफर सिद्धरामय्या यांनी नाकारली आहे. याबाबत बोलताना सिद्धरामय्या म्हणाले की, “काँग्रेस पक्षाच्या हायकमांडच्या सूचनेनुसार मी राजीनामा दिला आहे. तसेच मी पक्षाच्या हायकमांडला सांगितलं आहे की मला राज्यसभेत जायचं नाही. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत कर्नाटकच्या राजकारणात राहीन.”

‘कर्नाटकच्या राजकारणात सक्रिय भूमिका बजावणार’ : सिद्धरामय्या

सिद्धरामय्या यांनी गुरुवारी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. यावेळी सिद्धरामय्या यांनी आपली ठाम भूमिकाही बोलून दाखवली. आपण कर्नाटकच्या राजकारणातच सक्रिय भूमिका बजावत राहू, असं सिद्धरामय्या यांनी स्पष्टपणे सांगितलं. काँग्रेस हायकमांडकडून मिळालेली राज्यसभेच्या जागेची ऑफरही सिद्धरामय्या यांनी नाकारली. राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, “मी कर्नाटकच्या राजकारणात सक्रिय राहील. मला राष्ट्रीय राजकारणात रस नाही. कर्नाटकमधील काँग्रेस एका कुटुंबाप्रमाणे एकजूट राहील. काँग्रेस एका कुटुंबाप्रमाणे एकत्र राहावी हीच भूमिका माझी देखील कायम राहिली आहे. तसेच माझ्या कार्यकाळात मी सर्वांना समान वागणूक मिळावी यासाठी प्रयत्न केला.”

Siddaramaiah resigns Karnataka CM

डी.के.शिवकुमार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री होणार?

सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला असून आता डी.के.शिवकुमार हे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा आहेत. दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेतृत्वाने सिद्धरामय्या यांना पायउतार होण्यास सांगितलं होतं. त्यानुसार सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता राज्याची जबाबदारी डी.के.शिवकुमार यांच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेत्यांनी डी.के.शिवकुमार यांच्या नावाला पसंती दिल्याचं बोललं जात आहे.

कर्नाटकात नेतृत्व बदल का?

कर्नाटकातील नेतृत्वाचा मुद्दा जवळपास वर्षभराहून अधिक काळ चर्चेत होता. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाने सरकार स्थापन केल्यावर केंद्रीय नेतृत्वाकडून अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचं आश्वासन दिलं होतं असं सांगितलं जातं. त्यामुळे या मागणीवर डी.के.शिवकुमार यांचे समर्थक ठाम असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने सांगितली जाते. तसेच अडीच-अडीच वर्षाचं आश्वासन मिळाल्यामुळेच डी.के.शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा स्वीकार केला होता असंही सांगितलं जातं. त्यामुळे या अडीच-अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यानुसार सिद्धरामय्या यांनी राजीनामा दिला असल्याचं बोललं जात आहे.