कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून कॉंग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते सिद्धरामय्या यांनी सोमवारी सकाळी शपथ घेतली. बंगळुरूमधील श्री कांतीरवा मैदानावर झालेल्या दिमाखदार सोहळ्यात कर्नाटकचे राज्यपाल एच. आर. भारद्वाज यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी सिद्धरामय्या आणि कॉंग्रेसचे हजारो समर्थक तिथे उपस्थित होते.
६४ वर्षांच्या सिद्धरामय्या यांची १० मे रोजी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली होती. कर्नाटकमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेस स्पष्ट बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार, याकडे सर्वांचेच लक्ष होते. केंद्रीय मंत्री मल्लिकार्जुन खर्गे आणि सिद्धरामय्या यांच्यातच या पदासाठी मुख्य लढत होती. पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांनी सिद्धरामय्या यांच्या पारड्यात आपले बहुमत टाकून त्यांची मुख्यमंत्रीपदावर निवड करण्याचा मार्ग सुकर केला होता.
सिद्धरामय्या यांनी याआधी धरमसिंग यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात उपमुख्यमंत्री म्हणून काम केले होते. सहा वर्षांपूर्वीच त्यांनी जनता दलाला (धर्मनिरपेक्ष) रामराम ठोकत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता.