काँग्रेस नेता आणि गायक सिद्धू मुसेवालाची काही महिन्यापूर्वी हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी आता नवीन माहिती समोर आली आहे. पंजाब पोलिसांनी मुसेवाला हत्या प्रकरणात विदेशात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी सचिन बिश्नोईला अटक केली आहे. अजरबैजानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. तर, आणखी एक मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई हा केन्यामध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सचिन बिश्नोई हा लॉरेन्स बिश्नोईचा भाचा असल्याचं सांगितलं जात आहे. सचिन हा लॉरेन्स गँगला बाहेरुन चालवत असे. सचिन हा मुसेवाला हत्याप्रकरणात मास्टरमाईंड असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. सचिनच्या सांगण्यावरुनच संदीप उर्फ केकडाने सिद्धू मुसेवालाची रेकी केली होती. तो त्याचा चाहता बनून भेटण्यास गेला होता.

दरम्यान, सिद्धू मुसेवालाची हत्या करण्यापूर्वीच नकली पासपोर्टच्या माध्यमातून सचिन बिश्नोई आणि अनमोल हे विदेशात पळून गेले होते. या दोघांनी विदेशात बसून सिद्धूच्या हत्येची जबाबदारी पार पाडावी, असे लॉरेन्स बिश्नोईला वाटत होते. अनमोल विरोधात १८ गुन्हे दाखल आहेत. तो ७ ऑक्टोबर २०२१ ला जामिनावरती बाहेर आला होता. तर, लॉरेन्स बिश्नोईचा भाचा सचिन बिश्नोईवर १२ गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दोघांना घातले होते कंठस्नान

काही दिवसांपूर्वीच पंजाब पोलिसांनी सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणी अमृतसरमध्ये दोन गँगस्टर्सना कंठस्नान घातले होते. भारत-पाकिस्तान सीमेपासून १० किमी अंतरावर असलेल्या भकना गावात पोलीस आणि गँगस्टर्संमध्ये ५ तास चकमक सुरु होती. या चकमकीत जगरुप सिंह रुपा आणि मनप्रीत मन्नू कुसा या दोघांना ठार केले होते. यातील मनप्रीत मन्नू कुसाने सिद्धू मुसेवालावर एके-४७ ने फायरींग केल्याचे सांगितलं जात आहे.