एक्सप्रेस वृत्तसेवा, पाटणा : पक्षात प्रवेश करण्याचा काँग्रेसचा प्रस्ताव अमान्य केल्यानंतर, निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी स्वत:चा राजकीय पक्ष स्थापन करण्याचे संकेत दिले आहेत. त्या दिशेने एक पाऊल म्हणून त्यांनी नागरी समाजाच्या सदस्यांना भेटणे सुरू केले असून, सुशासनाबाबत प्रतिक्रिया मिळवण्यासाठी ‘जन सुराज’ ही मोहीम सुरू केली आहे.

‘‘लोकशाहीतील अर्थपूर्ण भागीदार बनण्याचा आणि लोकाभिमुख धोरण तयार करण्यास मदत करण्याच्या माझ्या शोधातून मी १० वर्षांची ‘रोलर कोस्टर राईड’ केली. आता मी पान उलटत असून, मुद्दे अधिक चांगल्या रितीने समजून घेण्यासाठी आणि ‘जन सुराज’च्या मार्गावर खऱ्या मालकांकडे – लोकांकडे – जाण्याची वेळ आली आहे’’, असे किशोर यांनी ‘शुरुआत बिहार से’ अशा शीर्षकासह सोमवारी ट्विटरवर लिहिले.

‘आम्ही डॉक्टर्स, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह नागरी समाजातील ८० ते १०० लोकांची यादी तयार केली आहे. येत्या तीन दिवसांत किशोर या सर्वाची प्रत्यक्ष भेट घेतील’, असे किशोर यांच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले. किशोर भेटण्याची शक्यता असलेल्यांमध्ये आघाडीचे माहिती अधिकार कार्यकर्ते शिव प्रकाश राय, सामाजिक कार्यकर्ते मुकेश हिसारिया, मोतिहारीचे डॉक्टर परवेझ अझीझ व सामाजिक उद्योजक इरफान आलम यांचा समावेश आहे.

 ‘ज्यांनी बिहारमध्ये काम केले आहे आणि बिहारला काय हवे हे जे सुचवू शकतात, अशा लोकांपर्यंत पोहचणे ही या भेटींमागील कल्पना आहे’, असे या सूत्राने सांगितले. किशोर हे राजकीय नेत्यांनाही भेटत असल्याची माहिती दुसऱ्या सूत्राने दिली, मात्र त्यांची ओळख त्याने उघड केली नाही. ‘बिहारमध्ये केवळ नितीश कुमार मॉडेल चालेल’ असे सांगून, किशोर हे काही काळ ज्या पक्षासोबत होते, त्या जनता दल (संयुक्त) न मात्र किशोर यांच्या उपक्रमाला फारसे महत्त्व दिले नाही. तर, ‘किशोर हे निवडणूक रणनीतीकारापेक्षा अधिक कुणी नाहीत’, अशी प्रतिक्रिया भाजपने दिली.