Sikh man assaulted in Canada : परदेशात भारतीयांवरील हल्ल्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. कॅनडामध्ये एका शीख व्यक्तीला लक्ष्य करण्यात आले असून, त्याला माझ्या देशातून चालता हो म्हणत धक्का देण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, हा द्वेषपूर्ण गुन्हा असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. कॅनडामधील ओंटारियोमधील वुडस्टॉकमध्ये ही घटना घडली. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
धक्का दिला अन् वांशिक टिप्पणी
ही घटना २२ एप्रिल रोजी घडली. वृद्ध गृहस्थ पदपथावरून चालत जात असताना एका तरुणाने त्यांच्याजवळ येऊन त्यांना धक्का दिला आणि वांशिक टिप्पणी केली. पोलिसांनी सांगितले, तरुणाने पीडिताला त्यांच्या वांशिकतेच्या आधारावर लक्ष्य केले आणि हा हल्ला विनाकारण करण्यात आला होता. सुदैवाने, पीडित व्यक्तीला कोणतीही शारीरिक इजा झालेली नाही.
तू इथला नाही, चालता हो
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये आरोपी वारंवार शिवीगाळ करताना दिसत आहे. “तू इथला नाहीस, माझ्या देशातून चालता हो” असं तो व्हिडीओमध्ये ओरडताना दिसत आहे. पोलिसांनी माहिती दिली की, आरोपी तरुण टर्टल आयलंड स्कूलच्या परिसरातील कुंपण ओलांडून पळून गेला होता. या घटनेदरम्यान कोणत्याही विद्यार्थ्याला इजा झालेली नाही.
संबंधित तरुणाला अटक करण्यात आली असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जामीन सुनावणीसाठी त्याला कोठडीत ठेवण्यात आले आहे. वुडस्टॉक पोलीस दलाने एका निवेदनात म्हटले आहे की, “आमच्या समुदायात द्वेषपूर्ण कृत्यांना स्थान नाही. सर्व नागरिक सुरक्षित राहतील याची खात्री करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.”
वर्ल्ड शीख ऑर्गनायझेशनने या हल्ल्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली असून हे कृत्य अस्वीकार्य असल्याचं म्हटले आहे. अशा घटना शीखविरोधी द्वेषाच्या व्यापक स्वरूपाचा भाग असल्याचे सांगत, त्यांनी या प्रकारच्या घटनांची योग्य नोंद आणि संस्थात्मक प्रतिसाद सुधारण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, या प्रकरणातील तरुणाने माफी मागितले असल्याचेही वृत्त आहे. अनेकांनी त्याच्या कृत्यावर टीका केल्यानंतर त्याने माफी मागितली.
