अंगदसिंग पड्डा या शिख तरूणाचे बर्कलेमध्ये पदवीदान सोहळ्यात केलेले भाषण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. या तरूणाने समस्यांविरोधात एकत्र येण्यासाठी सगळ्यांनी जागतिक स्तरावर एकत्र यावे असा विचार अत्यंत अनोख्या पद्धतीने मांडला आहे. पदवीदान समारंभात तो आला. त्याने पारंपारिक कोट काढून ठेवला. आपल्या शर्टच्या बाह्या वर चढवल्या. त्यानंतर त्याने मस्तपैकी तीन-चार मिनिटे तबला वाजवला. तो काय करतोय हे लक्षात यायच्या आतच त्याने सगळ्या उपस्थितांचा ताबा घेतला, आणि म्हटला.. आता गंभीरपणे सांगतो ते नीट ऐका.. तुमचे डोळे काही सेकंदांसाठी मिटा.. आणि त्या समस्यांबाबत विचार करा ज्या सगळ्या जगाला भेडसावत आहेत. आणि हो लक्षात ठेवा आपण सगळे एकत्र येऊन त्या सोडवू शकतो. आता डोळे उघडा.. मी आज जे भाषण करतोय त्याचा गाभा हाच आहे. मी आज याठिकाणी कोणतेही औपचारिक भाषण करायला आलेलो नाही. मला तुमचे लक्ष वेधायचे आहे जागतिक समस्यांकडेच. अनेक समस्या सगळ्या जगाला भेडसावत आहेत, त्यावर आपण कसे उपाय योजू शकतो हे आपल्याला मिळालेले समृद्ध शिक्षण आपल्याला सांगणार आहे.
अंगद म्हणतो, पंजाबमध्ये काही दिवसांपूर्वी मी माझ्या दोन जवळच्या मित्रांना गमावले. कारण ते व्यसनांच्या आहारी गेले होते. व्यसनाधिनता ही एक समस्या आहे. ऑकलँडमध्ये जेव्हा मुलांना शाळेत जाता येत नाही, जेव्हा वातावरणात बदल होतो आणि शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होते, जेव्हा एक मुस्लिम महिला फक्त आपल्या नवऱ्याच्या दबावाखाली येऊन हिजाब वापरते, जेव्हा सीरियातल्या हल्ल्यात आपले कुटुंब गमावलेला बाप ढसाढसा अश्रू ढाळतो या सगळ्या समस्याच आहेत. जागतिक स्तरावर त्या भेडसावत आहेत. आपल्या शिक्षणाचा उपयोग आपण या समस्या सोडवण्यासाठी कसा करतो? हे जास्त महत्त्वाचे आहे.
बर्कले हे माझे घर आहे असे मी मानतो. माझे अनेक मित्र आहेत जे पगडी घालतात. एका मित्राला तर ओसामा बिन लादेन चिडवले जायचे आणि म्हटले जायचे की तू इथला नाहीयेस निघून जा.. मात्र माझ्या अनेक शिख मित्रांनी मला अशा प्रकारच्या त्रासापासून अनेकदा वाचवले आहे. सध्याच्या घडीला जगाकडे पाहिले तर जगात अनेक बदल दररोज घडत आहेत. या बदलांसोबत आपली लढाई रोज सुरू आहे. मात्र आपण जागतिक स्तरावर एकत्रितपणे या समस्यांना तोंड देऊ शकतो. अंगदचे हे भाषण सध्या सोशल साईट्स, यूट्युब या सगळ्यावर व्हायरल होते आहे. त्याचे शब्द ऐकून तिथे असलेले विद्यार्थीही गहिवरले. त्याची अनोखी पद्धत, अनोखी स्टाईल सगळ्यांचीच मने जिंकून गेली. अंगदला ब्राईटेस्ट बिझनेस अंडरग्रॅज्युएट हे अॅवॉर्ड देऊन काही दिवसांपूर्वीच सन्मानित करण्यात आले आहे.