इस्रायल, अमेरिकेने संयुक्त कारवाई करत इराणवर हल्ले सुरु केले. इराणकडूनही प्रत्युत्तर देण्यात येतं आहे. दरम्यान काँग्रेसच्या संसदीय दलाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एक पत्र लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल केले आहेत. अताउल्ला खामेनी यांच्या मृत्यूबाबत केंद्र सरकार गप्प का? भारताच्या परराष्ट्र धोरणाची नेमकी दिशा काय? असे सवाल सोनिया गांधींनी केले आहेत.
काय म्हटलं आहे सोनिया गांधींनी?
सोनिया गांधींनी इंडियन एक्स्प्रेसमध्ये एक लेख लिहित पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत सवाल केले आहेत. खामेनी यांच्या मृत्यूनंतर केंद्र सरकारने सूचक मौन बाळगलं आहे, या भूमिकेला नेमकं काय म्हणायचं? तुम्हाला वाटत नाही का की हे जबाबदारी झटकणं आहे?
संसदेचं सत्र पुन्हा सुरु झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यवस्था, मोदी सरकारचं अस्वस्थ करणारं मौन या सगळ्या विषयांवर चर्चा झाली पाहिजे.
खामेनींची हत्या ही समकालीन आंतरराष्ट्रीय संबंधांवर ही खोलवर जखम
सोनिया गांधी पुढे म्हणतात, १ मार्चला इराणने हे स्पष्ट केलं की त्यांचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी हे युद्धात ठार झाले आहेत. इस्रायल आणि अमेरिकेने केलेल्या संयुक्त कारवाईत ही घटना घडली आहे. याबाबत भारत शांत का आहे? एखाद्या देशाच्या प्रमुखाची अशा पद्धतीने हत्या केली जाते, समकालीन आंतरराष्ट्रीय संबंधांवर ही एक खोलवर जखम आहे. भारत सरकारने याबाबत सूचक मौन बाळगलं आहे. याला नेमकं काय म्हणायचं? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त ही घटना म्हणजे चिंता व्यक्त करणारी बाब आहे असं म्हटलं आणि मर्यादित प्रतिक्रिया दिली. मात्र ज्या पद्धतीने गोष्टी घडल्या त्याबाबत त्यांनी मौन बाळगलं आहे. इराण आणि भारताचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत, ते पाहता हे मौन अत्यंत अस्वस्थ करणारं आहे असंही सोनिया गांधींनी म्हटलं आहे.
आपल्या देशाचं परराष्ट्र धोरण काय?
सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे भारतासारख्या देशाने आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन झाल्याबाबत कुठलीही ठोस भूमिका घेतली नाहीये. त्यामुळे जगात चुकीचा संदेश जातो. खामेनी यांना टार्गेट करुन त्यांचा माग काढून ठार करण्यात आलं. त्यावर भारताने सूचक मौन धारण केलं आहे. ही बाब योग्य नाही. आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणावर आणि विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण करणारं हे मौन आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत भूमिका स्पष्ट करावी.
