भारतासारख्या मोठ्या देशात आजवर अनेक दुर्घटना घडल्या आहेत, गोरखपूरमधील रूग्णालयात घडलेले मृत्यू ही काही पहिली मोठी दुर्घटना नाही, असं वादग्रस्त वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केलं आहे.  राजीनामे मागणं काँग्रेसचं काम आहे त्याप्रमाणे ते मागत आहेत असंही शहा यांनी स्पष्ट केलं आहे. जन्माष्टमीचा उत्सव आपल्या जागी आहे तो देशात साजरा होतो आहे तसाच उत्तरप्रदेशातही साजरा होतो आहे, जन्माष्टमी साजरी करावी ही लोकांची धारणा आहे त्यामागे सरकारचं काहीही धोरण नाही असंही अमित शहा यांनी म्हटलं आहे.

गोरखपूरच्या बाबा राघव दास रूग्णालयात ऑक्सिजन अभावी ७० पेक्षा जास्त रूग्णांचा मृत्यू झाला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात जन्माष्टमी कशी काय साजरी होऊ शकते असा प्रश्न उपस्थित होतो आहे, त्याला अमित शहा यांनी उत्तर दिलं आहे.

शुक्रवारी ही घटना उघडकीस आली त्यानंतर देशभरात संताप व्यक्त होतो आहे. विरोधकांनी तर या मृत्यूंवरून योगी सरकारला धारेवर धरलं आहे. काँग्रेस नेते राज बब्बर यांनी तर उत्तर प्रदेश सरकार हे ‘खुन्यांचं सरकार आहे’ अशी टीका केली होती तसंच योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा दिलाच पाहिजे अशीही आग्रही मागणी त्यांनी केली होती.

आता या सगळ्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी काँग्रेसला उत्तर दिलं आहे. रूग्णालयाच्या निष्काळजीपणा या मृत्यूंना जबाबदार आहे असा ठपका ठेवण्यात आला आहे कारण, या रूग्णालयाचं ६९ लाखांचं ऑक्सिजनचं बिल थकलं होतं. या बद्दलची माहिती ऑक्सिजन पुरविणाऱ्या कंपनीनं वारंवार पत्रव्यवहार केला होता. मात्र रूग्णालय प्रशासनानं या पत्रव्यवहाराकडे सपशेल दुर्लक्ष केलं ज्यामुळे ही दुर्घटना घडली आहे.

गोरखपूर दुर्घटनेबाबत अमित शहा यांनी जे वक्तव्य केलं आहे त्यामुळे विरोधकांना भाजपवर टीका करण्याचा आणखी एक मुद्दा मिळाला आहे. गोरखपूरसारख्या घटना देशात याआधीही घडल्या आहेत ही काही पहिली मोठी दुर्घटना नाही असं वादग्रस्त वक्तव्य अमित शहा यांनी केलं आहे. त्यामुळे गोरखपूर प्रकरणावरून देशभरात संताप वाढतोय, अशात आता अमित शहा यांच्या वादग्रस्त वक्तव्याचीही भर पडली आहे.