सिंगापूर एअरलाइन्सचे २४० लोकांना घेऊन जाणारे जेट विमान आपत्कालीन परिस्थितीत उतरवताना  पेटले. त्यातील सर्व प्रवासी सुदैवाने वाचले. हे विमान मिलानकडे जात असताना सिंगापूरच्या चांगी विमानतळावर मागे वळवण्यात आले होते व ते उतरवण्यात येत होते. द सिंगापूर एअरलाइन्स फ्लाइट एसक्यू ३६८ या विमानाने पहाटे २ वाजून ५ मिनिटांनी चांगी विमानतळावरून मिलानकडे उड्डाण केले होते, पण उड्डाणानंतर दोन तासांनी वैमानिकाने या विमानाच्या इंजिनात बिघाड असल्याचे जाहीर केले.

नंतर हे विमान सिंगापूरला परत आणण्यात आले व इंजिन ऑइल वॉर्निग संदेशामुळे ते चांगी विमानतळावर उतरवले जात असताना विमानाच्या उजव्या इंजिनाने पेट घेतला. हे विमान सकाळी ६.५० वाजता चांगी विमानतळावर उतरले.

विमानाच्या इंजिनाला लागलेली आग विमानतळावरील आपत्कालीन सेवेने विझवली.

एका प्रवाशाने सांतिले की विमानाच्या इंजिनाचा स्फोट झाला व उजवे इंजिन जळाले. वैमानिकाने या समस्येची पूर्वसूचना देऊन विमान मागे नेण्यास सुरुवात केली. विमानतळावर उतरताना इंजिन पेटून ज्वाळा दिसल्या. विमानातूनही त्या दिसत होत्या. सिंगापूरला विमान उतरल्यानंतर आग विझवण्यात आली.