Singapore Chinese Cab driver : सिंगापूरमधील एका चिनी चॅक्सीचालकाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. टॅक्सीचालक आणि त्याच्या टॅक्सीत बसलेल्या महिला प्रवशामधील संभाषणाचा हा व्हिडीओ असून यामध्ये टॅक्सीचालक वांशिक शेरेबाजी करताना दिसतोय. हा टॅक्सीचालक महिला प्रवाशाला म्हणाला तुम्ही भारतीय आहात आणि मी चिनी आहे. तुम्ही भारतीय सर्वात वाईट ग्राहक आहात. ऑनलाइन टॅक्सी बूक करताना महिलेने चुकीची माहिती लिहिली होती. त्यामुळे चालक आणि प्रवाशात बाचाबाची झाली. दोघांमध्ये वाद सुरू असताना प्रवासी महिलेने या घटनेचा व्हिडीओ चित्रीत करून सोशल मीडियावर शेअर केला आहे.
चिनी टॅक्सीचालक आणि महिला प्रवाशात बाचाबाची सुरू असताना चॅक्सीचालकाने महिलेवर वांशिक शेरेबाजी सुरू केली. त्यामुळे महिलेने दोघांमधील संभाषणाचा व्हिडीओ चित्रीत केल्याचं तिने सांगितलं. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.




जेनेला होइडन नावाची महिला सिंगापूरमध्ये टॅक्सीने प्रवास करत होती. या प्रवाादरम्यान तिचा टॅक्सी चालकाशी वाद झाला. या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत महिलेने म्हटलं आहे की, मी अॅपवर चुकीची माहिती अपडेट केली होती. त्यामुळे टॅक्सीचालक माझ्यावर संतापला आणि त्याने माझ्यावर वांशिक शेरेबाजी केली. तो मला म्हणाला, “तुम्ही भारतीय आहात ना? मी चिनी आहे, लोकांना माहिती आहे की तुम्ही भारतीय आहात आणि मी चिनी आहे. तुम्ही सर्वात वाईट ग्राहक आहात. तुम्ही भारतीय मुर्ख आहात.”
हे ही वाचा >> प्रसिद्धीसाठी काहीपण! महिलेने प्रेग्नन्सी फोटोशूटसाठी ठेवली ‘अंत्यसंस्कार’ थीम, विचित्र फोटो पाहून डोकंच धराल
खरंतर ती महिला भारतीय नागरिक नाही. तिने सांगितलं की ती सिंगापूर-युरेशियन आहे. टॅक्सीचालकाच्या वांशिक शेरेबाजीनंतर ती महिला म्हणाली मी सिंगापूर-भारतीयदेखील आहे. पण तुम्ही जातीयवादी आहात. हा टॅक्सीचालक महिलेवर वांशिक शेरेबाजी करून थांबला नाही. त्याने या महिलेच्या ९ वर्षांच्या मुलीवरही कमेंट केली. हा टॅक्सीचालक त्याच्या मोडक्या-तोडक्या इंग्रजीत म्हणाला तुमची मुलगी १.३५ मीटरपेक्षा उंच नाही. माझ्याशी वाद घालू नका, तुमची मुलगी १.३५ मीटरपेक्षा बुटकी आहे. यावर महिला म्हणाली, माझी मुलगी १.३७ मीटर उंच आहे.