सिंगापूरमध्ये भारतीय गायक झुबीन गर्ग यांचा मृत्यू झाला. २०२५ मध्ये ही घटना घडली होती. या घटनेबाबत आता सिंगापूरच्या कोर्टाने वेगळाच दावा केला आहे. सिंगापूर पोलिसांनी म्हटलं आहे की सप्टेंबर २०२५ मध्ये जेव्हा झुबीन गर्ग यांचा मृत्यू झाला तेव्हा ते खूप नशेत होते आणि त्यांनी लाईफ जॅकेट घातलं नव्हतं. त्यांना लाईफ जॅकेट घालायला सांगितलं होतं. पण त्यांनी ऐकलं नाही. त्यानंतर ते लॅजरस आयलँडजवळ समुद्रात बुडाले आणि त्यांचा मृत्यू झाला असा दावा सिंगापूरच्या पोलिसांनी कोर्टात केला आहे.

सिंगापूरच्या तपास अधिकाऱ्यांनी काय सांगितलं

१९ सप्टेंबर २०२५ ला झुबीन गर्ग यॉर्ट पार्टीमध्ये सहभागी झाले होते. त्या दिवशीच त्यांना सिंगापूरच्या नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलमध्ये गाणं म्हणायचं होतं. पण ते समुद्रात पोहण्यासाठी उतरले आणि परतलेच नाहीत. कोर्टात मुख्य तपास अधिकाऱ्याने सांगितलं की झुबीन गर्ग यांना आम्ही लाइफ जॅकेट दिलं होतं ते सुरुवातीला त्यांनी घातलं आणि काही वेळातच काढून टाकलं. त्यानंतर आम्ही त्यांना दुसरं छोटं लाइफ जॅकेट दिलं पण ते घालण्यास त्यांनी नकार दिला. त्यावेळी ते बरेच नशेत होते. आम्ही या प्रकरणी प्रत्यक्षदर्शींनाही विचारणा केली. त्यांच्या सांगण्यानुसार झुबीन गर्ग प्रचंड नशेत होते. तसंच जुबीन यॉर्टच्या दिशेने पोहत यायचा प्रयत्न करत होते. पण त्यावेळी ते नशेत होते आणि शुद्ध हरपली. पाण्यात ते तोंड घालून पोहू लागले असं दिसलं तेव्हा त्यांना काही लोकांनी यॉर्टवर आणलं आणि सीपीआरही दिला. मात्र झुबीन यांचा जीव वाचला नाही. त्याच दिवशी त्यांना मृत घोषित करण्यात आलं. कोर्टाला हे सांगण्यात आलं की झुबीन गर्ग यांना फिट येणं आणि उच्च रक्तदाबाची मेडिकल हिस्ट्री होती. ज्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला त्याआधी त्यांनी त्यांची नियमित औषधं घेतली होती की नव्हती हे अद्याप समजलेलं नाही असंही तपास अधिकाऱ्यांनी सिंगापूर कोर्टाला सांगितलं. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

नेमकी घटना काय घडली होती?

झुबीन गर्ग यांचा १९ सप्टेंबर रोजी सिंगापूरमध्ये समुद्रात पोहताना मृत्यू झाला. यानंतर नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलचे (एनईआयएफ) मुख्य आयोजक श्यामकानू महंता, झुबीन यांचे मॅनेजर सिद्धार्थ शर्मा, झुबीनचे चुलत भाऊ आणि पोलीस अधिकारी संदीपन गर्ग आणि त्यांचे पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर नंदेश्वर बोरा आणि प्रबीण वैश्य यांना बुधवारी कामरूपच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडीत पाठवलं. या सर्वांच्या सुरक्षेबद्दल काळजी व्यक्त करत त्यांना कमी कैदी असलेल्या कोठडीत ठेवण्यात यावं, असे आदेश कोर्टाने दिले.