Indian Billionaire Ex Girlfriend Lawsuit: नात्यात असताना प्रेयसीवर केलेला प्रचंड खर्च ब्रेकअप झाल्यानंतर ‘कर्ज’ दाखवून वसूल करण्याचा भारतीय वंशाच्या एका उद्योगपतीचा प्रयत्न पुरता फसला आहे. प्रेयसीवर खर्च केलेले तब्बल ४ लाख ६८ हजार सिंगापूर डॉलर्स (अंदाजे साडेतीन कोटी रुपये) परत मिळावेत म्हणून सिंगापूरच्या उच्च न्यायालयात धाव घेणाऱ्या ‘टीसीआय एक्स्प्रेस लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ चंदर अग्रवाल यांना न्यायालयाने जोरदार झटका दिला आहे. हा खर्च म्हणजे कर्ज नसून प्रेमसंबंधात स्वेच्छेने दिलेल्या ‘भेटवस्तू’ होत्या, असे स्पष्ट करत न्यायालयाने अग्रवाल यांचा दावा फेटाळून लावला. द इंडियन एक्सप्रेसने सीएनएन आणि इतर माध्यमांच्या हवाल्याने सदर बातमी दिली आहे.
विमानातील भेटीचे प्रेमात रूपांतर
न्यायालयाच्या निकालपत्रातील माहितीनुसार, २०१९ मध्ये एका विमान प्रवासादरम्यान चंदर अग्रवाल यांची ओळख फेलिसिया ली यांच्याशी झाली होती. ली या पूर्वी एअर होस्टेस म्हणून काम करत होत्या. नंतर त्यांनी विमा सल्लागार आणि वैद्यकीय विक्री प्रतिनिधी म्हणून काम सुरू केले. पुढे सप्टेंबर २०२२ मध्ये दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू झाले. मात्र डिसेंबर २०२३ च्या सुमारास त्यांच्यात दुरावा आला आणि अग्रवाल यांनी ली यांच्यावर फसवणुकीचा संशय घेत हे नाते संपवले. त्यानंतर मार्च २०२४ मध्ये अग्रवाल यांनी ली यांच्याविरोधात कायदेशीर दावा ठोकला.
नाते औपचारिकरीत्या सुरू होण्यापूर्वीपासूनच अग्रवाल यांनी ली यांच्यावर मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च केले होते. ऑगस्ट २०२२ मध्ये त्यांनी ली यांच्यासाठी सिंगापूर एअरलाइन्सचे नवी दिल्लीसाठीचे ‘सूट्स क्लास’चे तिकीट काढले होते. तसेच त्यांना युरोप दौऱ्यावर नेऊन तेथील महागड्या हॉटेल्सचा खर्च, तसेच हर्मेस, सेलिन, डियोर आणि प्राडा यांसारख्या आलिशान ब्रँड्सच्या वस्तू भेट दिल्या होत्या.
“आपण एकत्र असताना माझ्या पैशांचा वापर करताना संकोच बाळगू नकोस,” असे सांगत अग्रवाल यांनी टॅक्सी, जेवण आणि ब्युटी पार्लरच्या खर्चासाठी ली यांना स्वेच्छेने बजेट देऊ केले होते, असेही न्यायालयाने नमूद केले.
अग्रवाल यांचा नेमका दावा काय होता?
अग्रवाल यांनी न्यायालयात असा युक्तिवाद केला होता की, नात्यादरम्यान केलेला हा खर्च म्हणजे बिनव्याजी कर्ज होते आणि ली यांनी ते परत करणे कायदेशीररीत्या बंधनकारक आहे.
यात विशेष बाब म्हणजे ली यांच्या घरासाठी घेतलेल्या फेंगशुई सेवेच्या १६,७७६ सिंगापूर डॉलर्सच्या खर्चाचाही समावेश होता. “मी भारतीय असल्याने माझा फेंगशुईवर विश्वास नाही; त्यामुळे हा खर्च कर्ज म्हणूनच दिला गेला असावा,” असा विचित्र दावा अग्रवाल यांनी केला. मात्र, व्हॉट्सॲप चॅट्स तपासल्यानंतर स्वतः अग्रवाल यांनीच फेंगशुईचा विषय काढून त्याचा खर्च उचलण्याची तयारी दर्शवल्याचे समोर आले.
न्यायालयाने दावा का फेटाळला?
या खटल्यात ज्येष्ठ न्यायमूर्ती ली सिउ किन यांनी पुराव्यांच्या अभावावरून अग्रवाल यांना फटकारले. दोघांमध्ये व्हॉट्सॲपवर हजारो मेसेजेसची देवाणघेवाण झाली असली, तरी ली यांनी पैसे उसने मागितल्याचा किंवा ते परत करण्याचे मान्य केल्याचा एकही लेखी पुरावा अग्रवाल सादर करू शकले नाहीत. एका वर्षांहून अधिक काळ चाललेल्या नात्यात असा कोणताही उल्लेख नसणे अनाकलनीय असल्याचे न्यायाधीशांनी म्हटले.
अग्रवाल हे अतिश्रीमंत उद्योगपती आहेत, तर ली यांचे उत्पन्न त्यांच्या तुलनेत अत्यंत सामान्य होते. अशा स्थितीत सामान्य पगाराची व्यक्ती महागड्या ब्रँड्सच्या चैनीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचे कर्ज वारंवार का घेईल? असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला.
अग्रवाल यांनी स्वाक्षरी असलेला एक हस्तलिखित करार न्यायालयात सादर केला होता; परंतु ली यांनी त्यावर स्वाक्षरी केली नसल्याचे स्पष्ट केले. न्यायालयानेही या कागदपत्राची सत्यता संशयास्पद मानली.
नाते सुरू होण्यापूर्वी स्वेच्छेने केलेला खर्च भेटवस्तू मानायचा आणि नाते सुरू झाल्यावर त्याच स्वरूपाचा खर्च अचानक ‘कर्ज’ ठरवायचा, हा अग्रवाल यांचा युक्तिवाद अतार्किक आणि सामान्य ज्ञानाला धरून नसणारा आहे, असे ताशेरे न्यायालयाने ओढले.
न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, अग्रवाल हे प्रेमात आकंठ बुडाले होते आणि त्यांनी ली यांच्यावर पैशांची उधळण केली होती. परंतु ब्रेकअप झाल्यानंतर आलेल्या कटुतेतून त्यांनी भेट म्हणून दिलेले पैसे परत मिळवण्यासाठी ही कायदेशीर लढाई सुरू केली.
