Singapore Government Dating App FirstDate : सिंगापूरमधील विक्रमी नीचांकी प्रजनन दरामुळे जन्मदर झपाट्याने घसरत चालला असल्याने, तेथील सरकारने आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन डेटिंग ॲप लाँच केले आहे, जेणेकरून त्यांनी एकमेकांना भेटावे आणि याद्वारे देशातील जन्मदर वाढण्यास मदत व्हावी. ‘फर्स्टडेट’ (FirstDate) नावाचे हे ॲप या महिन्यात प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आले असून सध्या ते केवळ सिंगापूरच्या शासकीय अधिकाऱ्यांसाठीच उपलब्ध आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

या ॲपच्या वापरकर्त्यांना त्यांच्या आवडीनिवडी आणि मूल्यांशी संबंधित काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. या माहितीचा वापर करून ॲपचा अल्गोरिदम एका वेळी एकच मॅच शोधून सिंगल्सच्या जोड्या जमवतो. बीबीसीच्या वृत्तानुसार, हे डेटिंग ॲप २१ ते ३५ वर्षे वयोगटातील लोकांसाठी मर्यादित आहे. यामधील अल्गोरिदम ‘स्वाइप फटीग’ (सतत स्वाइप करण्याचा कंटाळा) दूर करून वापरकर्त्यांना एक ‘अर्थपूर्ण नाते’ जोडण्यास मदत करते.

‘फर्स्टडेट’ने आपल्या वेबसाईटवर ‘गेल-शॅप्ले स्टेबल मॅरेज अल्गोरिदम’चा प्रामुख्याने उल्लेख केला आहे, ज्याद्वारे हा प्रोग्राम चालतो. एकदा जोडी जमल्यानंतर (पेअर झाल्यानंतर) त्या जोडप्याला डेट स्वीकारण्यासाठी तीन दिवसांचा वेळ दिला जातो. या ॲपमध्ये संवाद सुरू करण्यासाठी काही कल्पना देखील दिल्या जातात, ज्यांना ‘डेट क्वेस्ट्स’ (date quests) म्हटले गेले आहे.

“दिवसाच्या शेवटी, मला असं वाटतं की एखाद्या ॲप्लिकेशनद्वारे कोणालातरी भेटण्याचा अनुभव वेगवेगळ्या ॲप्सवर फारसा बदलत नाही”, असं संरक्षण मंत्रालयातील २९ वर्षीय कर्मचारी एलिझाबेथ यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले. “परंतु, यामध्ये फसवणूक (स्कॅम) होण्याची शक्यता खूपच कमी आहे हे जाणून आनंद होतो. आपण सगळेच शासकीय कर्मचारी आहोत आणि जोडीदाराच्या शोधात आहोत, बरोबर ना?”