सिंगापूरमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. प्रेयसीने प्रेमाला नकार देत फक्त मित्र बनून राहूया, असे सांगितले. त्यानंतर चिडलेल्या तथाकथित प्रियकराने आपल्या मैत्रिणीवर ३ मिलियन डॉलरचा (२४ कोटी) दावा ठोकला आहे. के. कॉशिगन असे मुलाचे नाव असून मुलीचे नाव नोरा टॅन असे आहे. नोराने कॉशिगनचा प्रेमाचा प्रस्ताव नाकारुन आपण फक्त चांगले मित्र असल्याचे सांगितले होते. आपण जिच्यावर जीवापाड प्रेम करतोय, तिच्यासाठी आपली किंमत फक्त एका मित्राची आहे, हे समजल्यावर कॉशिगन चांगलाच संतापला. आपल्या भावनांचा खेळ झाल्याचा आरोप करत त्याने हा दावा कोर्टात दाखल केला आहे.

स्ट्रेट टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, दोघांचीही पहिली भेट २०१६ मध्ये झाली होती. दोघांमध्ये मैत्रीचे नाते निर्माण झाल्यानंतर कॉशिगनच्या मनात नोरासाठी प्रेम जागृत झाले. मात्र नोराच्या मनात तशी काही भावना नव्हती. सप्टेंबर २०२० मध्ये नोराच्या लक्षात आलं की, कॉशिगनच्या मनात काहीतरी वेगळंच सुरु आहे. त्यानंतर दोघांमध्येही खटके उडू लागले. यानंतर आपला मानसिक छळ झाल्याचा खटला कॉशिगन नोरावर दाखल करणार होता. मात्र नोराने त्याच्यासोबत समुपदेशन घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यावेळी हा वाद तात्पुरता शमला.

तब्बल दीड वर्ष दोघेही समुपदेशन घेत होते. मात्र या दरम्यान कॉशिगन हे मानायलाच तयार नव्हता की, नोराचे त्याच्यावर प्रेम नाही. जेव्हा वैतागून नोराने कॉशिगन सोबतचा संपर्क तोडला, तेव्हा चवताळून कॉशिगन कोर्टात गेला. नोरामुळे माझ्या सामाजिक प्रतिष्ठेला बाधा पोहोचली असून तिच्यामुळे मी मानसिक नैराश्यात गेल्याचा दावा कॉशिगनने आपल्या केसमध्ये केला आहे. यासाठी नोराने त्याला नुकसान भरपाईपोटी ३ मिलियन डॉलर्स द्यावेत, अशी मागणीही केली आहे. या प्रकरणाची सुनावणी सिंगापूरमधील न्यायालयात ९ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यासोबतच सत्र न्यायालयात नोराच्या विरोधात आणखी प्रकरण दाखल करण्यात आले आहे. यामध्ये तिच्यावर २२ हजार डॉलरचा (जवळपास १८ लाख रुपये) दावा ठोकण्यात आला आहे. ज्यामध्ये आरोप केला आहे की, दोघांमधील संबंध सुधारण्यासाठी जो करार केला होता, त्या कराराचा नोराने भंग केला.