सिंगापूरच्या स्वातंत्र्यासाठी अविरत लढा देणारे स्वातंत्र्यसैनिक चिआ थे पोह यांची नोबेल शांतता पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. पोह यांना या लढय़ात ३१ वर्षे तुरुंगवास भोगावा लागला होता.

माजी पंतप्रधान ली कुआन येव यांचे निधन झाल्यावर सात महिन्यांनंतर चिआ यांच्या शिफारशीची घोषणा करण्यात आली. या निर्णयामुळे सिंगापूरच्या इतिहासात आणखी एक मानाचे पान जोडले जाणार आहे. बँकॉक विद्यापीठाचे प्राध्यापक जेम्स गोमेझ म्हणाले की, जानेवारीमध्येच चिआ यांची शिफारस निश्चित करण्यात आली होती. मात्र, आता त्यांच्या शिफारशीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. नोबेल निवड समितीकडून कुठल्याही उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येत नाहीत.

युरोपातील स्थलांतरितांबाबत महत्त्वाची भूमिका घेणाऱ्या जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मॉर्केल यांचे शांततेच्या नोबेल पारितोषिकासाठी नाव आघाडीवर आहे. सरकारविरोधी कारवाया केल्याप्रकरणी ७४ वर्षीय चिआ यांना १९६६ मध्ये अटक करण्यात आली होती. १९९० पर्यंत ते तुरुंगात होते. अंतर्गत सुरक्षा कायद्यानुसार चिआ यांना २३ वर्षे तुरुंगवास सोसावा लागला. त्यानंतर १९८९ मध्ये चिआ यांना नजरकैदेच ठेवण्यात आले होते. चिआ यांच्यावर सरकारविरोधी कारवाया वगळता कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.